केंद्राचे प्रकल्प आंधळेपणाने स्वीकारू नका

आपचे निमंत्रक राहुल म्हांबरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


29th October 2020, 11:18 pm
केंद्राचे प्रकल्प आंधळेपणाने स्वीकारू नका

पणजी : रेल्वे दुपदरीकरण आणि कळसा भांडुरासारखे प्रकल्प केंद्र सरकार गोव्याच्या माथी मारत असून, राज्य सरकारने असे प्रकल्प आंधळेपणाने स्वीकारू नयेत. गोव्याचे हीत पहावे. अन्यथा गोवेकर आंदोलने करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, असा इशारा आम आदमी पक्षाचे निमंत्रक राहुल म्हांबरे यांनी दिला आहे. 

वरील विषयाचे पत्र म्हांबरे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पाठवल्याची माहिती त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. या पत्रात ते म्हणतात, रेल्वे दुपदरीकरणाचा गोव्याला कुठलाही फायदा होणार नाही. गोमंतकीयांच्या माथी मारण्यात आलेल्या या प्रकल्पाची केवळ कर्नाटकाला मदत होणार आहे. त्यामुळे दिल्लीहून गोव्याच्या माथी मारण्यात येत असलेले असे प्रकल्प आंधळेपणाने स्वीकारू नका. गोवेकरांच्या हिताचे रक्षण करावे. दुपदरीकरणामुळे रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूंनी राहणाऱ्या गोवेकर कुटुंबांना कोळशाच्या भुकटीमुळे अनेक शारीरिक व्याधींचा सामना करावा लागेल. याशिवाय या वाहतुकीतून गोव्याला काहीच फायदा होणार नाही.

कर्नाटककडून म्हादईचे वळविण्यात आलेले पाणी, हा असाच गोव्यावर थोपलेला एक प्रकल्प आहे. कर्नाटकच्या या कारस्थानाला केंद्र सरकारचा आशीर्वाद आहे. बहुतेक गोवेकरांसाठी म्हादई ही जीवनदायिनी आहे. अनेक गोमंतकीय कुटुंबे जगण्यासाठी म्हादईच्या पाण्यावर अवलंबून आहेत. केंद्र सरकार मात्र, कर्नाटकच्या बाजूने आहे. या प्रकल्पामुळे केंद्र सरकारने लाखो गोवेकरांच्या जगण्यावर प्रश्नचिन्ह उभे करून ठेवलेले आहे, असेही म्हांबरे यांनी म्हटले आहे.

गोव्यातील भाजप सरकार पूर्वीच्या काँग्रेस सरकारचाच कित्ता गिरवत आहे. काँग्रेस सरकारने केंद्र सरकारचे आदेश पाळण्यातच धन्यता मानली. भाजप सरकारही तेच करीत आहे, अशी टीकाही म्हांबरे यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी पक्षीय राजकारणाचा विचार करू नये किंवा तो मुद्दा आणू नये. मुख्यमंत्र्यांनी आपला अधोगतीकडे नेणारा मार्ग बदलला नाही तर, गोवेकर आंदोलने आणि संघर्ष करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत, असा इशारा राहुल म्हांबरे यांनी दिला आहे.

हेही वाचा