कोलवाळ पॉवर ग्रीडमध्ये बिघाड

तीन तालुक्यांतील बत्ती दोन तास गुल

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
25th October 2020, 11:47 pm
कोलवाळ पॉवर ग्रीडमध्ये बिघाड

म्हापसा : ऐन दसऱ्याच्या दिवशी कोलवाळ पॉवर ग्रीड वीज प्रकल्पात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बार्देश, डिचोली व पेडणे या तीन तालुक्यातील वीजपुरवठा दुपारी खंडित झाला. ‍‍दोन तासानंतर तो सुरळीत झाला.
अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरहून कोलवाळ पॉवर ग्रीडला जोडणार्‍या वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाला. पॉवर ग्रीडला जोडणारी वीजवाहिनी ट्रीप झाली. त्यामुळे थिवी व माशेल या दोन मुख्य वीज उपकेंद्रांचाही वीजपुरवठा बंद झाला.
थिवी उपकेंद्रावरून बार्देश तालुक्यातील म्हापसा, नास्नोळा, नागवा, कांदोळी, साळगाव व पर्वरी या सहा तर डिचोली तालुक्यातील दोन व पेडणे तालुक्यातील दोन उपकेंद्रांना वीज पुरवली जाते. पॉवर ग्रीडवर अवलंबून असलेल्या दोन मुख्य केंद्रांसह बारा उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
वीजपुरवठा खंडित होताच अधिकरी आणि कर्मचाऱ्यांनी शोधकार्य हाती घेतले व दुरुस्तीकाम हाती घेतले. हे काम सुरू असताना माशेल उपकेंद्राला फोंड्याहून तात्पुरता वीजपुरवठा करण्यात आला होता. तसेच फोंड्यातून डिचोली उपकेंद्रालाही जोडणी दिली होती. त्यामुळे डिचोली तालुक्याचा वीजपुरवठा तास भरानंतर सुरळीत झाला होता. पण बार्देश व पेडणे तालुक्यात दोन तासांनंतर म्हणजे सायंकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास पुरवठा सुरळीत झाला.