यापुढे दिवसाला अडीच हजार चाचण्या !

आरोग्यमंत्र्यांची माहिती; प्लाझ्मा थेरपीही राहणार सुरू

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
23rd October 2020, 11:23 pm
यापुढे दिवसाला अडीच हजार चाचण्या !

पणजी : गेल्या काही दिवसांत करोना चाचण्या कमी झाल्या होत्या. त्यामुळे बाधितांची संख्याही कमी दिसून आली. यापुढे दिवसाला दोन ते अडीच हजार चाचण्या करण्यात येतील. याशिवाय राज्यात बाधितांवरील प्लाझ्मा थेरपीही सुरूच राहील, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.      

पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत आरोग्य सचिव अमित सतेजा, संचालक जुझे डिसा व गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर उपस्थित होते. शुक्रवारी झालेल्या तज्ज्ञ स​मितीच्या बैठकीत राज्यातील करोना चाचण्या वाढविण्याचे तसेच प्लाझ्मा थेरपी सुरूच ठेवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. प्लाझ्मासोबत देण्यात येत असलेल्या रेमडेसिवीर आणि स्टिरॉईड या औषधांचा गोव्यात मोठा फायदा होत आहे. यामुळे जवळपास ७० टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे प्लाझ्मा थेरपी आणि ही औषधे गंभीर बाधितांना यापुढेही देण्यात येतील. प्लाझ्मा बँकही सुरू राहील, असे मंत्री राणे म्हणाले.       

औद्योगिक कंपन्यांना खासगी लॅबमध्ये चाचण्या करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य सरकार केवळ गोमंतकीय सर्वसामान्य जनतेच्या चाचण्या करणार आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्यांनी किती दिवसांनंतर करोना चाचणी करावी, याचीही नियमावली तयार करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. बाधित झालेले अनेकजण घरीच अलगीकरणात राहण्याचा मार्ग निवडत आहेत. त्यामुळे कोविड निगा केंद्रामधील खाटा रिकाम्या राहत आहेत. पण घरी अलगीकरणात असलेल्यांनी दहा दिवसांनंतरही लक्षणे दिसत असतील तर तत्काळ केंद्रामध्ये दाखल होऊन उपचार घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.      

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पोस्ट कोविड विभाग सुरू करण्यात आले आहेत. या विभागात सध्या ६० पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. राज्य सरकारने पोस्ट कोविड उपचार गांभीर्याने घेतले आहेत. बाधित झाल्यानंतर संबंधिताला पुन्हा करोनाची लागण होऊ नये यासाठी आरोग्य खाते पूर्ण प्रयत्न करीत आहे. आरोग्य खाते आणि गोमेकॉ समन्वयाने काम करीत असल्यामुळेच राज्यातील करोनामुक्त होणाऱ्यांचा दर वाढत चालला आहे, असा दावाही मंत्री विश्वजीत राणे यांनी केला.  

तीन हजारपेक्षा अधिक कीट्सचे वाटप      

घरी अलगीकरणात असलेल्या तीन हजारांपेक्षा अधिक करोना बाधितांना आतापर्यंत घरी अलगीकरण कीटचे वाटप करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात कीटचे वाटप सुरू आहे. या प्रक्रियेत पूर्णपणे पारदर्शकता ठेवण्यात आली आहे, अशी मा​हिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. राज्यात ८,९४४ घरी अलगीकरण कीट आणण्यात आली होती. सद्यस्थितीत ५,३८४ कीट्सचा साठा सध्या उपलब्ध आहे, असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा