Goan Varta News Ad

पर्वरीतील सामाजिक कार्यकर्ते मेथर यांचा उपचारादरम्यान मृत्यू

पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न : अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा नोंद

|
15th October 2020, 11:10 Hrs

प्रतिनिधी । गोवन वार्ता

म्हापसा ः पाटो तोर्डा पर्वरी येथे पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या हल्ल्यात जखमी झालेले सामाजिक कार्यकर्ते विलास मेथर (४०, रा. सुकूर) यांचा गुरुवारी सकाळी गोमेकॉत उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पर्वरी पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस रात्री उशिरापर्यंत एक बिल्डर व त्यांचे कर्मचारी यांची चौकशी करत होते.

जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा हा हल्ला बुधवारी सायंकाळी ४ च्या सुमारास साल्वादोर द मुंद पंचायत क्षेत्रातील पाटो तोर्डा येथे शेत जमिनीतील रस्त्यावर घडला होता. मेथर आणि अन्य तिघा रहिवाशांनी पैठण येथे सुरू असलेल्या एका इमारतीच्या बांधकामाविरुद्ध पंचायतीकडे कागदपत्रे मागितली होती. विलास मेथर आणि त्याचे सहकारी मेथर यांच्या वाहनाने साल्वादोर द मुंद पंचायतीत बुधवारी सकाळी कागदपत्रे आणण्यासाठी गेले होते. कागदपत्रे मिळविल्यानंतर विलास यांनी सहकार्‍यांना सुकूर येथे सोडले व ते कारने पुन्हा तोर्डाच्या दिशेने गेले होते. वाटेत अज्ञातांनी गाठून त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकले व आग लावून ते पसार झाले होते. त्याच रस्त्याने जाणार्‍या एका दुचाकीस्वाराने होरपळत असलेल्या विलास यांच्यावरील आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यांना ते न जमल्याने त्यांनी विलास यांना शेतात जाण्यास सांगितले. शेतातील पाण्यामुळे आग विझली होती. त्यानंतर विलास यांना गंभीर जखमी अवस्थेत १०८ रुग्णवाहिकेतून गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

पर्वरी पोलिसांनी विलास यांची पत्नी हरिता यांच्या तक्रारीवरून बुधवारी रात्री उशिरा अज्ञात संशयितांविरोधात भा.दं.सं.च्या ३०७ कलमाखाली प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला होता. विलास यांचा सकाळी मृत्यू झाल्यामुळे पोलिसांनी कलम ३०७ गाळून त्या जागी ३०२ कलमाखाली खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.

गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पथक तयार

पर्वरी पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पर्वरी पोलिसांच्या मदतीला पणजी, कळंगुट, पेडणे व डिचोली पोलिसांचे पथक निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आले आहे. बांधकाम प्रकल्पावरून पंचायतीकडे तक्रार केल्यामुळे काटा काढण्यासाठी हा प्रकार झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या दृष्टीने बांधकाम करणारे बिल्डर व त्यांचे कर्मचारी यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. हल्ल्यात वापरलेल्या मोटारसायकलचा शोध पोलिस घेत आहेत. पुढील तपास अधीक्षक उत्कृष्ट प्रसून व उपअधीक्षक एडविन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक निनाद देऊळकर करत आहेत.