पाषाणालाही पाझर फोडणारा ‘वाय’

रुपेरी पडदा

Story: सौ. विद्या नाईक होर्णेकर |
11th October 2020, 11:34 am
पाषाणालाही पाझर फोडणारा ‘वाय’

आज ११ ऑक्टोबर. या दिवशी पहिली आठवणारी गोष्ट म्हणजे आज शताब्दीचा महानायक व हिंदी चित्रपटसृष्टी, किंबहुना संपूर्ण भारतीय सिनेसृष्टीचे प्रतिनिधित्व करणारा नायक अर्थात् अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस. आज त्यांच्यावर जगातील सर्वच थरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नुकतेच करोनाशी दोन हात करुन आलेल्या अमिताभ यांच्या चाहत्यांसाठी तर हा दिवस म्हणजे ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग...’, परंतु आजचा दिवस हा केवळ बिग बींच्या वाढदिवसापर्यंतच सीमित नसून, या दिवशी आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘मुलगी दिन’ही साजरा केला जात आहे. त्याचेच औचित्य साधून आज एका विशेष चित्रपटाचा उल्लेख इथे करावासा वाटला. खास करुन सध्या मराठी वाहिनी स्टार प्रवाहवर ‘मुलगी झाली हो’ ही मालिका पाहिल्यापासून तर का, कुणास ठाऊक वारंवार सदर चित्रपटाचा विषय मनात रुंजी घालत होता. हा चित्रपट म्हणजे ‘वाय’. नाव जरी प्रथम दर्शनी इंग्रजी वाटत असले तरी चित्रपट मात्र मराठी आहे. 

या चित्रपटाने गोव्यासह अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये आपली छाप सोडली आहे. चित्रपटाचा विषयच असा आहे की, त्याने थेट प्रेक्षकांच्या हृदयालाच हात घातला. मानव इतका व्यवहारी झाला आहे की आपल्या भावना व्यक्त करण्यासाठीही त्याला आता ‘दिवसां’ची आवश्यकता भासू लागली आहे. त्यामुळे कधी ‘मदर्स डे’ तर कधी, ‘फादर्स डे’ साजरा केला जातो. तर जागतिक स्तरावर जे विविध दिवस साजरे केले जातात, त्यात ‘मातृदिन, महिला दिन, कन्या दिन’ आदींचा समावेश होतो. तरीही, भारतात जिथे स्त्रीला शक्तीचे रुप म्हणून पूज्यनीय समजले जाते, त्याच देशात स्त्रियांची खरी स्थिती वेगळ्या भाषेत सांगावयास नको. इथे ना स्त्रीभ्रूण हत्येवर पुरती गदा आली आहे ना स्त्रीयांवर होणाऱ्या शारिरीक व मानसिक अत्यांचारांची संख्या रोडावली आहे. 

देशातील ही स्थिती चित्रपटांसारख्या प्रभावी माध्यमातून वारंवार मांडली गेली. परंतु, ‘वाय’ या चित्रपटात ‘स्त्रीभ्रूण हत्या’ हा विषय जितक्या सफाईदारपणे मांडला गेला; तसा तो क्वचितच अन्य कुठल्या चित्रपटात मांडला गेला असावा, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरता कामा नये. चित्रपटाचे कथानक, त्याची मांडणी व त्यातील कलाकारांचा कसदार अभिनय या गोष्टी तर आहेतच, शिवाय या चित्रपटाचे नावही बरेच काही सांगून जाते.

एका मुलाखतीदरम्यान दिग्दर्शक डाॅ. अजित वाडीकर यांनी सांगितले होते की, त्यांनी ‘‘वाय’ हे नाव निवडले कारण त्याचे दोन अर्थ होतात. एक इंग्रजी शब्दात ‘वाय’ अर्थात् ‘व्हाय’ म्हणजे ‘का...’ तर ‘मीच का’ असा प्रश्न ते स्त्रीभ्रूण विचारत असावे व दुसरे कारण म्हणजे मुलगी किंवा मुलगा होण्यासाठी पुरुषामधील ‘वाय किवा एक्स’हे दोनच ‘क्रोमोझोम्स’ कारणीभूत असतात, वाय यांचा संयोग स्त्रीच्या एक्स क्रोमोझोनशी झाल्यास मुलगा होतो आणि दोघांचाही एक्स-एक्स चा संयोग हा मुलीचे भ्रूण निर्माण करतो. त्यामुळे ‘वाय’विषयी काहींची असलेली मानसिकता सदर शीर्षक अधोरेखित करते.’ त्यामुळे ‘थोडक्यात बरेचकाही’ म्हटले जाते ते नक्की हेच असावे; हे सदर शीर्षकातून व्यक्त होते. 

‘वाय’ चे कथानक जितके चांगले आहे, तितकाच हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्याही उत्तम आहे. या चित्रपटाला दिग्दर्शक उत्तम न्याय देऊ शकला, कारण चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. अजित वाडीकर हे स्वत: डॉक्टर आहेत. दिग्दर्शनासोबतच या चित्रपटात वैद्यकिय अधिकाऱ्याची मुख्य भूमिका करणारी अभिनेत्री मुक्ता बर्वे व ‘डॉक्टर पुरुषोत्तम’ची नकारात्मक भूमिका करणारे नंदू माधव यांचा अभिनय तर अगदी ‘लाजवाब’. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात एका इस्पितळात घडलेल्या सत्य घटनेवरील हे कथानक. देवाची उपमा दिल्या जाणाऱ्या डॉक्टरच्या प्रतिमेला डागाळणाऱ्या काही समाजकंटकांना व सैतानी मनोवृत्तीचे किळसवाणे दर्शन घडवणाऱ्या देशातील सर्वांत संवेदनशील विषयाला या चित्रपटात अधोरेखित केले गेले आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या गुन्ह्यांना खतपाणी घालणारे पालक, गर्भनिदान करुन थोड्याशा पैशांसाठी मानवता वेशीला टांगणारे डॉक्टर्स व त्यांना सुरक्षा पोहोचवणारे लाचखोर पोलिस अधिकारी यांना अशा प्रकारांमध्ये क्वचितच शिक्षा होते... हा सामाजिक, नैतिकतेचा इतकेच नव्हे तर न्यायव्यवस्था व मानवतेचाही पराभव असल्याची जाणीव हा चित्रपट करुन देतो. 

चित्रपटाचे संवादही प्रेक्षकांना नखशिखांत हादरवतात. ‘सोनोग्राफी मशीन सील करता येतात पण दृष्टिकोण नाही’सारखे संवाद अंतर्मुख करतात. आज आंतरराष्ट्रीय मुलगी दिनाच्या पार्श्वभूमीवर जर शक्य झाले तर प्रत्येकाने हा चित्रपट एकदा तरी पहावा. कारण पाषाण हृदयालाही पाझर फुटावा अशा प्रकारे कथानक मांडणारे चित्रपट मोजकेच असतात. हा त्यातीलच एक चित्रपट असून, समाज सुधारायचा असेल तर आपण सुधारणे आवश्यक असल्याचा संदेश हा चित्रपट अगदी नकळत देऊन जातो.

(लेखिका नामवंत चित्रपट समीक्षक आहेत.)