Goan Varta News Ad

जलशास्त्रज्ञांकडून कळसाची पाहणी

- म्हादईतील क्षारतेचीही तपासणी : अहवाल गोव्यासाठी निर्णायक

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
17th September 2020, 09:35 Hrs
जलशास्त्रज्ञांकडून कळसाची पाहणी

डिचोली : राष्ट्रीय जलशास्त्र संस्था रुरकी येथील जल शास्त्रज्ञ डॉ. गोपाळ कृष्णा आणि डॉ. नितेश पटीदार यांनी गुरुवारी कणकुंबी येथील कळसा प्रकल्पाला भेट देऊन संशोधन आणि अभ्यास करण्यासाठी निरीक्षण केले. त्यांच्यासोबत जलसंसाधान खात्याचे सहाय्यक अभियंता दिलीप नाईक उपस्थित होते. त्यासोबतच म्हादईतील क्षारतेचीही तपासणी करण्यात आली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्ली येथील जलशक्ती   मंत्रालयाचे लक्ष वेधून कर्नाटकातील कळसा, भांडुरा येथून गोव्याकडे येणारे पाणी मलप्रभेत वळवले तर तिची क्षारता वाढून गोव्याच्या पर्यावरण व परिसंस्थेवर गंभीर परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार जल मंत्रालयाने म्हादई नदीतील क्षारतेचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय जलशास्त्र समिती नियुक्त केल्याचे घोषित केले होते. त्यानुसार या संस्थेचे दोन शास्त्रज्ञ दाखल झाले आणि त्यांनी पाहणी करत काही नमुने गोळा केले. 

कणकुंबी येथे कळसा कालव्याचा संगम पारवड येथून येणार्‍या सीमेची न्हय येथे होतो. तेथे जाऊन या शास्रज्ञांनी क्षारतेची पाहणी केली. त्यानंतर कळसाचे पाणी जेथून मलप्रभेत जाते तेथे आणि वाळवंटीच्या घोटेली, साखळी, पिळगाव येथील पाण्यातील क्षारतेची तपासणी केली. यापूर्वी राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांनी २००८मध्ये सादर केलेल्या शोधनिबंधात कर्नाटककडून पाणी वळण्याच्या प्रयत्नामुळे गोव्यावर होणार्‍या संभाव्य दुष्परिणामांविषयी विवेचन केले होते. दरम्यान, दोन्ही शास्रज्ञ हे आपली निरीक्षणे नोंद करणार आहेत. 

पाहणीचे महत्त्व असे... 

* कर्नाटकला सध्या कळसा व भांडुरा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ना हरकत दाखल पाहिजे आहे. त्या पार्श्वभूूमीवर गुरुवारी करण्यात आलेली पाहणी आणि त्याचा अहवाल महत्वाचा ठरणार आहे. 

* पुढील दिवसांत गोवा सरकारची अवमान याचिका व विशेष याचिका सर्वोच्य न्यायालयात सुनावणीला येणार आहे. 

* त्यावेळी गोवा सरकारला पर्यावरणीय संवेदनशीलता व पश्चिम किनारपट्टीवरील क्षारता या बाबत आवश्यक पुरावे न्यायालयात सादर करावे लागणार आहेत. 

* राष्ट्रीय जलशास्त्र संस्था आपला अहवाल काय देते, यावर सदर याचिकेचे भवितव्य अवलंबून आहे.