पेडणे पोलिस उपनिरीक्षकाचे ड्रग्ज पेडलर्स सोबत सेटिंग?

- पार्से परिसरात नागरिकांतून जोरदार चर्चा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
15th September 2020, 09:30 pm
पेडणे पोलिस उपनिरीक्षकाचे ड्रग्ज पेडलर्स सोबत सेटिंग?

पणजी : सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणानंतर नॉर्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) ड्रग्सची पाळेमुळे खोदण्याचा विडा उचचला आहे. अशावेळी पेडणेतील एक वादग्रस्त पोलिस उपनिरीक्षक मात्र ड्रग्स माफियांना कारवाईचा धाक दाखवून ‘सेटिंग’ करत आहे, अशी जोरदार चर्चा पार्से परिसरात सुरू आहे. पार्से येथे गेल्या काही दिवसांपासून पेडणेच्या एका पोलिस उपनिरीक्षकाने दोन कॉन्स्टेबलच्या साह्याने ड्रग्स पेडलर्सवर छापासत्र सुरू केले आहे. अशा कारवाईत ड्रग्स माफियांच्या एका टोळीतील दोघांना वेगवेगळ्या दिवशी पकडण्यात आले. त्यांच्याकडून मादक पदार्थांचा साठाही हस्तगत करण्यात आल्याचे कळते. मात्र, त्यानंतर त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता सोडण्यात आले. या छाप्यात पोलिसांनी मोठा मुद्देमाल जप्त केला असावा, असा ग्रामस्थांचा कयास होता. परंतु कारवाईअभावी या छाप्यावर गावकर्यांनी संशय व्यक्त केला आहे. केवळ ‘सेटिंग’ करण्यासाठीच सदर ड्युटी ऑफिसरने ही ड्रग्स पेडलर्सविरोधात मोहीम राबविली की काय, अशी चर्चा गाव व परिसरात सुरू आहे. या कारवाईबाबत पोलिस निरीक्षक व इतर सहकारी देखील ‘ब्र’ काढण्यास तयार नाहीत. 

सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरण ड्रग्सशी जोडले गेले आहे. त्याचे कनेक्शन गोव्यापर्यंत आहे. एनसीबीने गोव्यातील ड्रग्सची पाळेमुळे शोधून काढण्याचे काम हाती घेतले आहे. अशा वेळी ब्युरोला स्थानिक पोलिसांचे सहकार्य अपेक्षित आहे. पण, पेडणे पोलिसांकडून ड्रग्स पेडलर्सना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू आहे, असा ग्रामस्थांचा दावा आहे.