क्लावडिओ कुलासो- उत्तम व्हिडिओग्राफर

कलाकार

Story: इजिदोर डांटस |
13th September 2020, 12:29 pm
क्लावडिओ कुलासो- उत्तम व्हिडिओग्राफर

क्लावडिओ कुलासो हे व्हिडिओग्राफर. गोव्यात, खास करून तियात्र क्षेत्रात ते लोकप्रिया आहेत. त्यांचा जन्म ६ मार्च रोजी नावेली- मडगाव येथे झाला. लाॅयोलाचे ते विद्यार्थी. १९८५ ली गोष्ट. नोकरी गेल्याने त्यांनी व्हिडिओग्राफी करण्याचे ठरविले. त्याकाळी रंगीत टीव्ही येऊन काही काळच झाला होता. व्हिडिओ रेकाॅर्डरही बाजारात आले होते. मुंबईची एक संस्था याचा अभ्यासक्रम त्याकाळी शिकवत होती. क्लावडिओ यांनी तेथे जाऊन प्रशिक्षण घेतले. सध्या त्यांचा मडगाव येथे वियर्ड वर्ल्ड प्राॅडक्शन्स ही संस्था आहे. मडगावात व्हिडिओग्राफी सुरू करणारे ते पहिले.

क्लावडिओ यांनी संगीताच्या सुमारे पंधरा आॅडिओ ध्वनिफिती निर्माण केल्या आहेत. काजार जातोच, संवसाराची आस, देसघातकी मंत्री, बदलो, कोणाक पातयेनाका, कोंकणी कॅरल्स, म्हाका जियेंवंक जाय, टायमपास, सोडून गेलें, निर्मोण, गोवा, कॅरल्स ईन कोंकणी, बुदवंत. शेवटची ध्वनिफित भांगराचो ताळो. ही त्यांनी ख्रि. आल्फ्रेड रोझ यांना अर्पण केली आहे. ते हयात असताना त्यांनी ही कॅसेट प्रकाशित केली होती. 

क्लावडिओ यांनी रोज तूं? हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. यात गोव्यातील अमली पदार्थ धंद्यावर प्रकाश टाकला आहे. अनेक कोकणी चित्रपट महोत्सवात तो दाखविण्यात आला होता. तांत्रिकदृष्ट्या हा चित्रपट उत्कृष्ट झाला आहे. त्यांनी काही विनोदी ध्वनिफितीही काढल्या आहेत. यात विलियम दे कुडतोरी, जापसी, सियेलो, व्हिक्टर दा कुन्हा, सी. डी. सिल्वा, अँथनी आंबाजी या कलाकारांनी काम केले आहे. 

कोकणी चित्रपटांना चांगले भविष्य आहे. मात्र, ते तांत्रिकदृष्ट्या चांगले व्हायला हवेत. गोव्यात फिल्म स्टुडिओ, तंत्रज्ञ, मार्केट आणि निर्माते कमी आहेत, याची खंत वाटते, असे त्यांनी सांगितले. चित्रपट, व्हिडिओ फिल्म प्रस्तुत करायला मला आवडेल, असेही ते म्हणाले. रोज तूं? चित्रपटासाठी गोवा मनोरंजन सोसायटीने त्यांचा गौरव केला आहे. सध्या ते नावेली येथे राहतात. 

(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)