अमेरिकन ओपन खेळण्यासाठी जोकोविच सज्ज


14th August 2020, 08:49 pm
अमेरिकन ओपन खेळण्यासाठी जोकोविच सज्ज

बेलग्रेड :जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावरील सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जाेकोविच वर्षातील चौथा ग्रँड स्लॅम अमेरिकन ओपनमध्ये सहभागी होणार आहे. याबाबत त्याने स्वत: माहिती दिली आहे.
सुरुवातीला जोको​विचने अमेरिकन ओपन टेनिस संघाच्या काही भूमिकेवर टीका केली होती. करोना संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी खेळाडूच्या पथकातील सदस्यांची कमी करण्यासारख्या काही नियमांवर त्याने नाराजी व्यक्त केली होती.
जाेकोविचने सांगितले, सर्व अडथळे व आव्हानामध्ये हा निर्णय सोपा नव्हता. मात्र पुन्हा खेळण्याच्या विचाराने मी रोमांचित आहे. अमेरिकन ओपन ३१ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत खेळवण्यात येणार आहे. रॉजर फेडरर व राफेल नदालसारख्या दिग्गजांनी या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
स्वित्झर्लंडचा दिग्गज रॉजर फेडररने गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर न खेळण्याचा निर्णय घेतला तर दुसरीकडे ३४ वर्षीय नदालने मंगळवारी आपल्या निर्णयाची मा​हिती दिली. त्याने सांगितले की, परिस्थिती अवघड आहे व कोविड-१९ची प्रकरणे वाढत आहेत. असे वाटत आहे यावर आम्ही नियंत्रण ठेवण्यात अपयशी पडत आहोत.
महिला गटात जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेली ऑस्ट्रेलियाची अॅश्ली बार्टीनेही या स्पर्धेतून माघार घेतली आहे.