Goan Varta News Ad

बंगळुरूमध्ये हिंसाचार; तीन ठार

६० पोलिस जखमी : मानहानीकारक पोस्ट शेअर केल्यामुळे तणाव

|
13th August 2020, 02:30 Hrs
बंगळुरूमध्ये हिंसाचार; तीन ठार

बंगळुरू : सोशल मीडियावर अपमानजनक पोस्ट शेअर केल्यामुळे निर्माण झालेल्या तणावातून बंगळुरूमध्ये मोठा हिंसाचार झाला. संतप्त जमावाने काँग्रेस आमदार अखंड श्रीनिवासमूर्ती यांच्या घरावर हल्ला केला. येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या देखील फोडाव्या लागल्या. यावेळी झालेल्या हिंसाचारात तिघांचा मृत्यू झाला. तर एसीपीसह ६० पोलिस जखमी झाले आहेत. या हिंसाचार प्रकरणी ११० जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बंगळूर शहरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. ही हिंसाचाराची घटना मंगळवारी रात्री घडली.
काँग्रेस आमदार अखंड श्रीनिवासमूर्ती यांच्या भाच्याने फेसबुकवर अपमानजनक पोस्ट टाकली होती. काही वेळाने ही पोस्ट डिलिट करण्यात आली. या पोस्टमुळे तणाव निर्माण झाला आणि मोठ्या संख्येने आलेल्या जमावाने काँग्रेस आमदारांच्या बंगळुरू येथील घरावर हल्ला केला. या हल्ल्यात घराची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. सोशल मीडियावर अपमानजनक पोस्ट केल्याप्रकरणी संशयित नवीन याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती बंगळुरू पोलिसांनी दिली आहे.
अधिक मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री जमावाने काँग्रेस आमदाराच्या घरावर हल्ला केला. जमावाने घराच्या आवारात असलेल्या १० ते १५ गाड्या पेटवून दिल्या. आमदाराच्या घरालाही आग लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन जमावाला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. यावेळी जमावाला रोखताना जोरदार धुमश्चक्री झाली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.
हिंसाचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला असून सुमारे ६० पोलिस जखमी झाले आहेत. पोलिसांच्या अनेक गाड्या पेटवल्या आहेत. जमावाने बेसमेंट भागातील सुमारे २००-२५० गाड्यांही पेटवून दिल्या. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती बंगळुरू शहर पोलिस आयुक्त कमल पंत यांनी दिली.
शहरात संचारबंदी लागू
या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी ११० लोकांना अटक केली आहे. रात्री उशिरा येथील परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरीही येथे अद्याप तणावस्थिती कायम आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण बंगळुरू शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. डीजे हल्ली आणि केजी हल्ली या दोन पोलिस स्थानक क्षेत्रात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.