परीक्षेतील टक्केवारी, वास्तव आणि आपण...

हे विद्यार्थी अनुत्तीर्ण होण्याचे नेमके कारण काय, कोण आहेत हे विद्यार्थी, त्यांच्या अपयशाची कारणमीमांसा होऊन त्यांना नव्याने पुन्हा उभे राहण्यासाठी स्फूर्ती देण्याची पद्धत आपल्याकडे आहे का, की आपण त्यांना जगण्यासाठीच अपात्र ठरवून मोकळे झालेलो आहोत.

Story: दृष्टिक्षेप | किशोर नाईक गावकर |
31st July 2020, 09:42 pm
परीक्षेतील टक्केवारी, वास्तव आणि आपण...

दहावीचा निकाल झाला एकदाचा जाहीर. सोशल मीडियावर टक्केवारीची स्पर्धाच सुरू आहे. अभिनंदनांचा वर्षाव होतो आहे. करोना महामारीच्या प्रचंड दहशतीखाली या परीक्षा संपन्न होऊनही विद्यार्थ्यांनी दाखवलेली चमक अचंबित करणारीच ठरली. गेल्या सहा वर्षांच्या निकालांचा विक्रम मोडीत काढणारा यंदाचा निकाल चमत्कारिकच होता. एकीकडे विद्यार्थ्यांचे पालक आणि संबंधितांकडून कौतुक तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्त्यांकडून कौतुक. मुख्यमंत्र्यांच्या परीक्षा घेण्याच्या धाडसाचे गुणगान गायले जाणे स्वाभाविकच होते. ९२.६९ टक्के निकालात राज्यातील तब्बल ११८ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. त्यात ८३ अनुदानित आणि ३५ सरकारी शाळांचा समावेश आहे. निकालानंतर पुढे काय. सर्वसामान्य पालकांना सतावणारा हा प्रश्न. दुर्दैवाने त्याचे उत्तर देण्याची सोय आपल्याकडे नाही. असली तरीही ती मर्यादित. वास्तविक उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण अशा सर्वांचेच समुपदेशन होऊन त्यांच्या मनाचा ठाव घेणे तसेच त्यांना पुढील दिशा निश्चित करण्यासाठी सहाय्य करणे ही खरी गरज. दहावीनंतर एकदा मार्ग चुकला की मग पुढे पाच वर्षांनंतर त्याचा पश्चात्ताप होतो. तोपर्यंत आपण चुकीच्या वाटेने बरेच पुढे गेलेलो असतो आणि मग मागे फिरणे कठीण बनून जाते.
समाज माध्यमांवर टक्केवारींची बोली लावून अभिनंदनाचा पाऊस पडत असतानाच आमचे मानसशास्त्रज्ञ मित्र डॉ. रुपेश पाटकर यांचा मेसेज आला. ‘आपल्याकडे कमी टक्केवारी मिळालेले किंवा अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थीही आहेत. एकीकडे अव्वल टक्केवारी मिळवलेल्यांवर अभिनंदनांचा
वर्षाव सुरू असताना या विद्यार्थ्यांकडे मात्र अपराधीपणाने समाज आणि खुद्द त्यांचे कुटुंबीय पाहतात. परीक्षेतील टक्केवारी म्हणजेच आयुष्याचे यशापयश अशी व्याख्या केली जाते. ह्याची दुसरी बाजू ठळकपणे येण्याची गरज आहे.’ डॉक्टरांचा मेसेज वाचल्यावर लगेच विचारचक्र सुरू झाले. अरेच्चा, मी स्वत:च दहावीत पास श्रेणीत उत्तीर्ण झालो होतो. पण म्हणून मला काही म्हणजे काहीच फरक पडला नाही. मेहनत आणि चिकाटी हीच तर यशाची गुरूकिल्ली असते. लगेच फेसबुकवर हा पोस्ट टाकला. आत्तापर्यंत टक्केवारीच्या महास्पर्धेत स्तब्ध होऊन बसलेले माझा पोस्ट वाचून सुखावले आणि त्यांनी भरभरून या पोस्टला लाईक्स आणि कमेंट दिल्या. टक्केवारीच्या पलीकडेही एक मोठ्ठे जग आहे हेच यातून अधोरेखित झाले.
फेसबुकच्या या पोस्टबाबत एका ज्येष्ठ शिक्षकाने मला खाजगीत एक मेसेज टाकला. ‘तुझ्या पोस्टवर माझे मत ५०-५० टक्के आहे.’ बरोबरच आहे ते. टक्केवारीवर काहीच अवलंबून नाही, असे म्हटले तर विद्यार्थी गैरसमज करून घेऊ शकतात. मग अभ्यास करायची गरजच काय, असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो. माझ्या पोस्टचे तात्पर्य एवढेच की वास्तव, आपली क्षमता, आवड या सर्व गोष्टींचा विचार करूनच शिक्षणाचा मार्ग निवडणे उचित ठरेल. केवळ कुणीतरी दबाव टाकतो, कुणालातरी आपण हे करावे असे वाटते म्हणून आपण शिक्षणाची दिशा ठरवू नये. आपल्या अवतीभोवती अशांची गर्दी आहे. आपल्या इच्छेविरोधात भलतीकडेच आपण भरकटत जातो आणि आयुष्यातील मजाच हरवून बसतो. आयुष्यात करण्यासारखे खूप काही असते, परंतु त्याबाबत आपण अनभिज्ञ असतो. ही अनभिज्ञता दूर होणे गरजेची आहे. कुणीतरी वाट दाखवण्याची किंवा निश्चित मार्गाचा शोध लावून देण्याची गरज असते.
यंदा दहावी परीक्षेला १८,९३९ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यांपैकी १७,५५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजे १३८५ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. या व्यतिरीक्त ७३७ विद्यार्थी फेरपरीक्षेला बसले होते. त्यातील ३४५ उत्तीर्ण तर ३९२ अनुत्तीर्ण झाले. ह्याचा अर्थ दुसऱ्या प्रयत्नांतही अनुत्तीर्ण झालेल्यांचा आकडा उत्तीर्णापेक्षा अधिक आहे. मुख्य आणि फेरपरीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्यांचा एकूण आकडा १,७७७ आहे. हे विद्यार्थी अनुत्तीर्ण होण्याचे नेमके कारण काय, कोण आहेत हे विद्यार्थी, त्यांच्या अपयशाची कारणमीमांसा होऊन त्यांना नव्याने पुन्हा उभे राहण्यासाठी स्फूर्ती देण्याची पद्धत आपल्याकडे आहे का, की आपण त्यांना जगण्यासाठीच अपात्र ठरवून मोकळे झालेलो आहोत. या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकडे मागे वळून पाहण्यात ना शाळांना, ना समाजाला ना सरकारला कुणालाच रस असत नाही हे दुर्दैव आहे.
आमचे मित्रवर्य तसेच शिक्षण या विषयात विशेष रस घेऊन त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी धडपडणारे प्रा. संजय देसाई यांनी एक महत्त्वाची आकडेवारी सादर केली. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांत इयत्ता नववीत २८,१०८ विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती. २०१९-२० मध्ये मात्र इयत्ता दहावीत नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा केवळ १८,९३९ आहे. ह्याचा अर्थ ९,१६९ विद्यार्थी हे इयत्ता नववीतूनच गळाले. आता हे विद्यार्थी गळाले की गाळले गेले हा संशोधनाचा विषय आहे. हे विद्यार्थी इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणार नाहीत, असा पूर्वग्रह करून घेऊन त्यांना दहावीत प्रवेश नाकारण्यात आला. कारण यांपैकी एखादा विद्यार्थी तथाकथित शंभर टक्के निकालाच्या शाळेतील परंपरेला घातक ठरू शकला असता. पण मग हे ९,१६९ विद्यार्थी आहेत कुठे. ते इयत्ता नववीत शिकत आहेत की शाळा सोडून गेले. याची काही नोंदणी शिक्षण खात्याकडे आहे का. यंदा ११८ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. सहजपणे या शाळांवर नजर टाकली. त्यात अगदी ५ विद्यार्थ्यांपासून ते १४९ विद्यार्थ्यांच्या शाळांचा समावेश आहे. शंभर टक्के निकालाचा हा सोस म्हणजे शिक्षणाच्या बाजारातील जाहिरातबाजीच बनली आहे. या जाहिरातबाजीला चाप लावणे गरजेचे आहे.
शिक्षणाच्या नावाने हा जो काही खेळखंडोबा सुरू आहे, त्याबाबत सखोलपणे चिंतन हवे आहे. आपल्याकडे शिक्षण खाते हे सहजा मुख्यमंत्र्यांकडेच असते. मनोहर पर्रीकर यांनी नेहमीच शिक्षण हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे असे म्हटले, परंतु त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात विद्यार्थ्यांना लॅपटॉप, बिनव्याजी कर्ज योजना वगळता क्रांतिकारी शैक्षणिक परिवर्तनाचा एकही निर्णय झालेला नाही, असे खेदाने म्हणावे लागते. डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडूनही शिक्षण हे इतर खात्यांपैकी एक खाते या भावनेतूनच पाहिले जात आहे. सुदैवाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मंजूर झाले आहे. या धोरणात अनेक क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची ताकद आहे. मुख्यमंत्र्यांनी या संधीचा लाभ घेऊन शिक्षणतज्ज्ञांची (राजकीय कार्यकर्ते नव्हे) समिती नियुक्त करावी. ह्यात बुजूर्ग आणि नव्या दमाच्या लोकांचा समावेश असावा. ज्ञान आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून नव्या शैक्षणिक भवितव्याचा पाया रचण्याचा हा योग त्यांनी दवडता कामा नये, एवढेच सुचवावेसे वाटते.