सिरी ए फुटबॉल लीग : युवेंट्सला कॅग्लियारीकडून पराभवाचा धक्का
मिलान :लाजियोने सिरी ए फुटबॉल लीगमध्ये दुसऱ्या स्थानावर राहण्याची आपली आशा जिवंत ठेवताना तळातील लीगमध्ये घसरलेल्या ब्रेसियाचा २-० गोलने पराभव केला. काईराे इमोबाईलने लाजियोतर्फे सत्रातील ३५ गोल नोंदवला. यामुळे या सत्रातील तो आघाडीचा गोलपटू बनू शकतो. त्याने युवेंट्सच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोवर चार गोलांची आघाडी घेतली आहे.
याचसोबत इमोबाईल सिरी ए सत्रात सर्वाधिक ३६ गोल करण्याच्या विक्रमापासून एका गोलने दूर आहे. हा विक्रम नापोलीच्या गोंजालो हिगुएनच्या नावावर आहे. त्याने २०१५-१६मध्ये हा विक्रम केला होता.
इमोबाईलव्यतिरिक्त जोकीन कोरियाने संघातर्फे दुसरा गोल नोंदवला. लाजियोचे अटलांटा प्रमाणे समान गुण झाले आहेत. ते दुसऱ्या स्थानावरील इंटर मिलानपासून एका गुणाने पिछाडीवर आहेत. अंतिम फेरीतील सामन्यांमध्ये अटलांटाचा सामना इंटर मिलानशी होईल तर लाजियोला नापोलीचा सामना करायचा आहे.
युवेंट्सचा कॅग्लियारीकडून पराभव
युवेंट्सला इटालियन फुटबॉल लीग सिरी ए लीगमध्ये कॅग्लियारीकडून २-० असा पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात कॅग्लियारीने आक्रमक सुरुवात केली व याचा त्यांना फायदाही झाला.
सामन्याच्या ८व्या मिनिटाला लुका गागलियानोने गोल करत कॅग्लियारीला १-० गोलने आघाडी मिळवून दिली. जियोवन्नी शिमोनने हाफ टाईमच्या अतिरिक्त वेळेत गोल करत कॅग्लियारीला २-०ने पुढे नेले व हाच गोल फरक निर्णायक ठरला.
या पराभवामुळे युवेंट्सचे जास्त नुकसान झाले नाही. त्यांनी २०१९-२०२० सत्रातील सिरी ए किताब आधीच आपल्या नावावर केला आहे. युवेंट्सने सोमवारी सम्पदोरियाचा २-०ने पराभव करत किताब जिंकला होता. क्लबचा हा सलग ९वा सिरी ए किताब आहे.
सिरी ए गुणतक्त्यात युवेंट्सकडे दुसऱ्या स्थानावरील इंटर मिलानपेक्षा चार गुणांची आघाडी असून त्यांचे आता ८३ गुण आहेत. दुसरीकडे कॅग्लियारीकडे केवळ ४५ गुण असून ते गुणतक्त्यात १३व्या स्थानावर आहेत. या सत्रातील अखेरच्या सामन्यात युवेंट्स २ ऑगस्ट रोजी रोमाशी लढणार आहे.