गणरायाचा उत्सव साजरा करताना यंदा सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार नाही. त्याऐवजी रक्तदान, प्लाझ्मादान, रुग्णसेवा यासारख्या उपक्रमांना प्राधान्य देणे योग्य ठरेल.
गोवेकरांचा सर्वांत मोठा सण म्हणून प्रसिद्ध असलेली गणेश चतुर्थी नेमकी चार आठवड्यांवर आली आहे. आजपासून चौथ्या शनिवारी म्हणजे २२ ऑगस्ट रोजी घराघरांत गणरायाचे आगमन होईल, भक्तिभावाने विधिपूर्वक गणपतींची स्थापना केली जाईल. त्यासाठी गावागावांतील पारंपरिक कलाकारांचे हात गणेशमूर्ती बनविण्याच्या कामात गुंतलेले आहेत. येत्या काही दिवसांत मूर्ती रंगाने सजू लागतील. धो धो बरसणारा आषाढ संपून श्रावण लागला की हिंदू धर्मीयांच्या अनेक सणांना सुरुवात होते. हे सण साजरे करीत असतानाच, श्रावण संपत आला, आता भाद्रपद लागेल अाणि गणेश चतुर्थी येईल, तयारी सुरू केली पाहिजे असे विचार गृहिणींच्या मनातून घोळत असतात. करंज्या-मोदकांचे नियोजन होत असते. तयार होत असलेल्या गणेशमूर्तींची छायाचित्रे वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होऊ लागतात. कोणाच्या घरी किती दिवस गणपती, कोणत्या सार्वजनिक मंडळाच्या गणेशोत्सवात कोणते कार्यक्रम असतील याबाबत चर्चा सुरू होतात. काही मंडळांच्या कार्यक्रमांबाबत राज्यभरात उत्सुकता असते. शहरांतील लोक गणेश चतुर्थीला मूळ घरी जाण्यासाठी रजेची आखणी करू लागतात.
या साऱ्या उत्साहपूर्ण तयारीला यंदा करोनाने गालबोट लावले आहे. विघ्नहर्ता म्हणून ज्याच्याकडे भाविकांकडून बघितले जाते त्या गणरायाच्या वाटेतच करोनाने अडचणी निर्माण करून ठेवल्या आहेत. गणेश चतुर्थी हा गाेव्यात मुख्यत: घरोघरी साजरा होणारा सण असला तरी चतुर्थीच्या दिवसांत लोकांची एकमेकांच्या घरात जा-ये असते. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे कुटुंबाचे सारे घटक गणेश चतुर्थीला आपल्या घरी जमतात. एरवी गावातील ज्या घरात दोन-तीन, फार फार तर चार-पाच माणसे राहतात त्या घरात आठ-दहा, दहा-बारा माणसांची उठबस सुरू होते. चुलते जास्त संख्येने असलेल्या घरात वीस-पंचवीस जण आरामात जमतात. पूजा-आरती आणि नैवेद्य झाल्याशिवाय दुपारचे आणि रात्रीचे जेवण होत नाही. दीड दिवसापेक्षा पाच दिवस किंवा त्याहून जास्त दिवस गणपतीची मूर्ती पुजण्याचा नेम विशेषत: ग्रामीण भागातून उत्साहाने पाळला जातो. सार्वजनिक मंडळांचा गणेशोत्सव दहा दिवस तरी असतोच. यंदा मात्र करोनाच्या संकटामुळे दीड दिवसात हा उत्सव उरकण्याची मानसिकता तयार झाली आहे.
असेल साधेपणावर भर
माणसाच्या संपर्कातून या रोगाचा संसर्ग होत असल्यामुळे जेवढी माणसे जवळ येतील तेवढी संसर्गाची शक्यता अधिक. त्यामुळे यंदा बहुतांश घरांतून दीड दिवसाची गणेश चतुर्थी असेल. गणरायाच्या विसर्जनाबरोबर करोनाच्या विषाणूंचीही परतपाठवणी होवो हीच प्रार्थना प्रत्येकाच्या तोंडी असेल. गेल्या पाच-सहा महिन्यांत करोनाने गोव्यात, भारतात आणि संपूर्ण जगात धुमाकुळ घातला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. यंदाच्या गणेश चतुर्थीवर करोनाचे सावट असेल हे नक्की आहे.त्यामुळे खूप काळजी घेऊन, आपापल्या घरात गणरायाचा उत्सव साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. एकाच कुटुंबातील सदस्य असले तरी ते वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेले असतील. त्यामुळे घरातही सुरक्षित अंतर पाळणे आवश्यक बनेल. पूजा, आरती, नैवेद्य, प्रसाद, भोजन आदी प्रत्येक टप्प्यावर काळजी घ्यावी लागेल. सार्वजनिक मंडळांनाही जाहीर कार्यक्रम न करता साधेपणाने दीड दिवसांत गणेश चतुर्थी आटोपावी लागेल. मंडळांच्या गणेश चतुर्थीत कमीत कमी लोकांनी वावरणे, तेही चेहरा झाकून, स्वच्छता राखून, हे नियम पाळावे लागतील.
हवीत मार्गदर्शक तत्त्वे
राज्य सरकारकडून एवढ्यात गणेश चतुर्थी साजरी करण्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर व्हावयास हवी होती. मूर्तीच्या आकारावर मर्यादा घालावयाच्या असतील तर मूर्तीकारांचे काम सुरू होण्याच्या वेळेसच समजले पाहिजे. सार्वजनिक मंडळांच्या गणेशोत्सवाला मार्गदर्शक तत्त्वे महत्त्वाची ठरतात. मंडप घालणे, पूजा, आरत्या, कार्यक्रमांचे आयोजन, उत्सवाच्या ठिकाणची स्वच्छता, विसर्जनाची मिरवणूक आदी बाबतींत मार्गदशक तत्त्वे आली तर त्यानुसार गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा करता येईल. महाराष्ट्र सरकारने घरगुती आणि सार्वजनिक उत्सवांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यामुळे तेथील गणेश चतुर्थीचे स्वरुप स्पष्ट झाले आहे. अशाच प्रकारचे पाऊल गोव्यातही सरकारने उचलले पाहिजे. अर्थात महाराष्ट्रातील पुण्या-मुंबईसारखी गर्दी गोव्यात होत नाही. तरी गर्दी टाळण्यावर भर देणे गरजेचे आहेच. गणरायाचा उत्सव साजरा करताना यंदा सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार नाही. त्याऐवजी गणेशोत्सवात रक्तदान, प्लाझ्मादान, रुग्णसेवा यासारख्या उपक्रमांना प्राधान्य देणे योग्य ठरेल.