म्हापशात मजुरांचा गावी जाण्यासाठी अट्टाहास

प्रथम प्राधान्य देण्याचे उपजिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th May 2020, 10:01 am

म्हापसा : आम्हाला सरकारी जेवण निवारा नको, आम्हाला केवळ घरी जावू द्या. आपणाकडे व्यवस्था होत नसेल तर आम्हाला पायी चालत जाण्याची परवानगी द्या, आम्हाला आमचे घर गाठायचे आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांद्वारे घरी जाण्याची व्यवस्था करा, असा अट्टाहास पेडे-म्हापसा क्रीडा मैदानावरील निवारा केंद्रातील सुमारे अकराशें मजूर वर्गाने धरला व सुमारे पाच तास गोंधळ घातला. उपजिल्हाधिकारी व पोलिसांच्या मनधरणीनंतर हा मजूर वर्ग शांत झाला.
मडगाव रेल्वे स्थानकावर घरी जाण्यासाठी मजूर वर्गाची मोठी गर्दी उसळली होती. या गर्दीतील ८०० लोकांना गुरुवारी व शुक्रवारी पेडे क्रीडा संकुलातील निवारा केंद्रात आणून ठेवण्यात आले होते. शिवाय इतर काही मजूरांना तसेच केरी तपासणी नाक्यावर गावी जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या व अस्नोडा भागात राहणाऱ्या लोकांना शनिवारी मध्यरात्री निवारा केंद्रात आणून ठेवण्यात आले होते. यात उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल व बिहार मधील लोकांचा समावेश होता.
रविवारी सकाळी ७ पासून चहापानाच्या वेळी या मजूर वर्गाने आम्हाला घरी जाण्याची परवानगी देण्यात यावी असा हट्ट धरला. त्यांनी कर्मचारी वर्गाकडे हुज्जत घालून निवारा केंद्राच्या बाहेर ठाण मांडली. निवारा केंद्रात गोंधळ उडाल्याची माहिती मिळताच म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दंडाधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत पोलिस उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई, निरीक्षक तुषार लोटलीकर व पोलिसांनी या मजूर वर्गाची समजूत काढणायाचा प्रयत्न केला. पण त्यांची घरी जाण्याची मागणी सुरूच होती. अडीच तासांनंतर मामलेदार व उपजिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. उपजिल्हाधिकारी मामू हागे, अक्षय पोटेकर, मामलेदार लक्ष्मीकांत कुट्टीकर, दशरथ गावस, कृष्ण गावस, राजाराम परब यांनी या मजूर वर्गाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आंदोलक मजूर वर्ग ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे या मजूर वर्गाला पांगविण्यासाठी जादा पोलिस बळ मागविण्यात आले. तसेच त्यांना इतर निवारा केंद्रात दाखल करण्यासाठी कदंब बस मागविण्यात आल्या. कळंगुट पोलिस निरीक्षक नोलास्को रापोझ, हणजूण पोलिस निरीक्षक सुरज गावस, पर्वरी पोलिस निरीक्षक निनाद देऊळकर पोलिस फाट्यासह दाखल झाले. तसेच यावेळी शस्त्रास्त्र पोलिसांचे पथकही दाखल झाले होते.
आम्ही रोजंदारी कामगार आहोत. काम धंदा नाही, हातात पैसा नाही, घर मालक खोलीभाडे मागत आहेत. अशा स्थितीत आम्हाला घरी जाऊ द्या. आपण आम्हाला फक्त सीमा पार करण्याची मुभा द्या, पुढे आमचे आम्ही बघून घेऊ, अन्यथा आमच्या मुख्यमंत्र्यांकडे संपर्क साधा आणि आमची घरी जायची व्यवस्था करा. आम्हाला आताच तुमचा काय तो निर्णय सांगा, असा हट्ट या कामगार वर्गाने उपजिल्हाधिकारी मामू हागे यांच्याकडे धरला. शुक्रवारी जाणाऱ्या गोवा ते जबलपूर रेवा रेल्वेची कल्पना देणारा संदेश आल्यानंतरही आम्हाला जायला दिले गेले नाही, असे सांगून मोबाईलवर आलेला संदेशही मध्यप्रदेशच्या मजूर वर्गाने उपजिल्हाधिकाऱ्यांना दाखविला.
यावेळी पोलिसांनी सर्व राज्यांतील मजूर वर्गाचा वेगळा गट केला. यामध्ये उत्तर प्रदेश व मध्यप्रदेशच्या लोकांची मोठी संख्या होती. उपजिल्हाधिकारी मामू हागे व अक्षय पोटेकर यांनी या आंदोलक लोकांना रेल्वे मार्गे त्यांच्या घरी जाण्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर हा मजूर वर्ग शांत झाला. पश्चिम बंगालच्या गटाला कळंगुटमध्ये, तर बिहारच्या गटाला म्हापशातील दुसऱ्या निवारा केंद्रात बसमधून पाठविण्यात आले. तर मध्यप्रदेश व उत्तर प्रदेशच्या लोकांना क्रीडा संकुलातीलच निवारा केंद्रात ठेवण्यात आले.
दरम्यान, क्रीडा संकुलातील निवारा केंद्रातील मजूर वर्गाने बार्देश तालुक्यात राहणाऱ्या आपापल्या गावातील मजूरांना फोन करून मैदानाकडे बोलविले होते. या लोकांना मैदानात प्रवेश दिला गेला नाही. मैदानाच्या फाटकाच्या बाहेर थांबलेल्या सुमारे दीडशे लोकांची पोलिसांनी समजूत काढून त्यांना पुन्हा माघारी पाठविले.



...आमच्या प्रति सहानुभूतीही नाही
जीवनावश्यक वस्तूंचे दर दुप्पट झाले आहेत. काम नाही तर पैसा नाही, असा पवित्रा कंत्राटदाराने घेतला आहे. लॉकडाऊनचा फटका आम्हा गरीबांना बसला आहे. अशिक्षित म्हणून आम्हाला हिन वागणूक दिली जात आहे. पैसेवाल्यांना विमान, रेल्वे व बस सेवेने घरी आणले जाते. पण, आमच्या प्रति प्रशासन, मंत्री, आमदारही सहानभूती दाखवित नाहीत, असा आरोप या मजूर वर्गाने केला.