चेकनाक्यावरून लोक कसे येतात : खंवटे

राज्य सरकारने खुलासा करावा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th May 2020, 10:01 am

पर्वरी : राज्य सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे राज्यात करोनाग्रस्तांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढायला लागले आहे. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे राज्य सरकार करोनाबाधितांचा खरा आकडा जाहीर करीत नाही. राज्यात ४०च्या वर करोनाग्रस्ताचा आकडा पोहोचला आहे. गोव्यातील चेकनाक्यावरून एवढे लोक गोव्यात कसे येतात, याचा सरकारने खुलासा करायला हवा, असे माजी महसूलमंत्री तथा पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी पर्वरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
समाजसेवक वॉल्टर लोबो यांनी अलीकडेच एका व्हिडिओमार्फत कळंगुट हॉटेलच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये नोंदणी केलेल्या १६ मोटारसायकल कशा आल्या, याचा सवाल केला होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकारणाची कसून चौकशी करण्याएेवजी पोलिसांना वॉल्टर लोबो यांना अटक करण्याचा आदेश दिला. हे असेच चालू राहिले तर गोव्यात थोड्याच दिवसांत क‍रोनाग्रस्तांची संख्या भरमसाट वाढेल, अशी भीतीही आमदार रोहन खंवटे यांनी व्यक्त केली.



गोवा बोर्डाच्या दहावी व बारावी परीक्षा काही दिवसांवर आल्या असून सरकारने परीक्षा केंद्राचे सेनिटायझेशन अद्याप केलेली नाही. तसेच ज्या शिक्षिकांची परीक्षा केंद्रावर बोर्डाने नियुक्ती केली आहे, ते शिक्षक कोरानामुक्त आहेत की नाही हे बघितले नाही. जर कुठल्याही विद्यार्थ्याला कोरानाचा संसर्ग झाला तर त्याला जबाबदार कोण ?

- रोहन खंवटे, आमदार, पर्वरी