मनोज प्रभाकरला १४ वर्षांनी पेन्शन सुरू


16th May 2020, 04:03 pm

मुंबई : भारताचा माजी अष्टपैलू मनोज प्रभाकर याला १४ वर्षांनंतर पेन्शनची रक्कम मिळाली. प्रभाकरवर मॅच फिक्सिंगच्या आरोपावरून ५ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. ही बंदी २००५ मध्ये संपली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने प्रभाकरची थकबाकी मंजूर केली. यामध्ये निवृत्तीवेतन, बेंव्हलंट फंड आणि एकरकमी लाभ यांचा समावेश आहे. 

माजी अष्टपैलू प्रभाकर याला बोर्डाकडून एकूण १ कोटी रुपये मिळाले आहेत. यापूर्वी मंडळाने माजी कर्णधार महंमद अझरुद्दीनची थकबाकीदेखील मंजूर केली होती. त्याला दीड कोटी रुपये मिळाले होते. 

काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती की, स्थानिक खेळाडूंना बक्षिसे मिळालेली नाहीत. ही बक्षिसे ४ महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आली होती. बीसीसीआयने ती मंजूर केली आहेत. यापैकी २ पुरुष खेळाडूंना अडीच लाख रुपये मिळाले. त्यामध्ये सिक्कीमचे मिलिंद कुमार (रणजी करंडकातील सर्वाधिक धावा), बिहारचा कर्णधार आशुतोष अमन (रणजी करंडकातील सर्वाधिक विकेट) यांचा समावेश आहे. 

महिलांमध्ये टीम इंडियाची स्टार सलामीवीर शेफाली वर्मा हिची ज्युनियर क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून निवडण्यात आली आणि दीप्ती शर्मा हिला वरिष्ठ स्थानिक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडले गेले. दोघांनाही प्रत्येकी १.५ लाख रुपये बोर्डाने दिले आहेत. 

याशिवाय पुरुष खेळाडूंना दीड लाख रुपये मिळाले. त्यापैकी पुडुचेरीचे सिडक सिंग (२३ वर्षांखालील सीके नायडू ट्रॉफीमधील सर्वाधिक विकेट), झारखंडचा आर्यन हुडा (१६ वर्षांखालील विजय मर्चंट स्पर्धेमधील सर्वाधिक धावा), झारखंडचा अभिषेक यादव (विजय मर्चंट स्पर्धेमधील सर्वोच्च विकेट), गुजरातचा मनन हिनराजिया (२३ वर्षांखालील सीके नायडू ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा), गुजरातचा अपूर्व आनंद (१९ वर्षांखालील कूच बिहार ट्रॉफीमधील सर्वाधिक विकेट) आणि केरळचा वत्सल गोविंद बिहार ट्रॉफीमध्ये (१९ वर्षांखालील स्पर्धेत सर्वाधिक धावा) यांचा समावेश आहे. 

कनिष्ठ क्रिकेटपटूंच्या कुटुंबीयांवर लॉकडाऊनचा परिणाम झाला आहे. सिदाकचे वडील कपडे विकतात. बरेच दिवस त्यांना आर्थिक समस्या भेडसावत होती. बोकारोमध्ये अभिषेक यादव यांचे वडील रेल्वेमध्ये वर्ग डी कर्मचारी आहेत. अभिषेकला आजीच्या उपचारासाठी पैसे हवे होते. त्याच्या वडिलांना कर्ज घ्यावे लागले. गुरुवारी १४ मे रोजी संध्याकाळपर्यंत पैसे मिळाल्याची ६ खेळाडूंनी पुष्टी केली आहे.