अमेरिकेतील आदिवासी

नवलाईच्या शोधात

Story: डाॅ. प्रमोद पाठक |
21st March 2020, 11:43 am


-
अमेरिकेतील आदिवासी तेथे केव्हा आले, याविषयी मतमतांतरे असली तरी शेवटच्या हिमयुगाच्या सुरुवातीच्या काळात ते सायबेरियामार्गे अमेरिकेच्या अलास्का भागात प्रथम स्थलांतरीत झाले असावेत असे पुरातत्वविदांना वाटते. सुमारे २० हजार वर्षांपूर्वी हिमयुगाला सुरवात झाली. आर्क्टिक रेषेच्या आसपासच्या भागात बर्फाच्छादन सुरू झाले. त्या काळात अलास्का आणि सायबेरिया याच्या दरम्यान सध्या जिथे बेरींगची सामुद्रधुनी आहे तो भाग कोरडा होता. हिमाच्छादनापासून दूर जाण्यासाठी काही मानवसमूह बेरींगची सामुद्रधुनी (Bering Strait) ओलांडून अलास्कामार्गे अमेरिकेत स्थलांतरित झाले. नंतर अलास्कातही बर्फाच्छादित भूभाग वाढत होता. त्यामुळे उत्तर अमेरिकेतील विस्कॉंसिन या राज्यातून ते खाली उतरले. काही हजार वर्षांच्या काळात ते सध्याच्या मेक्सिको देशातून दक्षिण अमेरिकेत उतरून चिली देशाच्या दक्षिण टोकाशी थेट दक्षिण धृवालगतच्या भागापर्यंत पसरले. त्यांच्या अमेरिकेतील प्रसाराचा मार्ग माझ्या संग्रही असलेल्या The American Heritage of Indians या सव्वाचारशे पानी पुस्तकात सविस्तर आणि सचित्र दिला आहे. या हजारो वर्षांच्या काळात अगदी प्राथमिक अवस्थेत असलेले समाज जसे जसे विस्तारत गेले तसे तसे त्यांचे टोळ्या टोळ्यांमधून विभाजन होत गेले. त्यांच्यातील काही समाजांची नावे, अन्साझी, अपाचे, चेरोकी, सू, कोमांचे अशी होती. अक्षरश: शेकडो समाजांमध्ये ते विभागलेले होते. त्यांच्यात सतत युद्धे होत असत. नरमांस भक्षणाची प्रथा प्रचलित होती. ऍझ्टेक संस्कृतीमधील नरबळी आणि नरमांस भक्षणाच्या प्रथेची नोंद झाली आहे.
या समाजांच्या निरनिराळ्या भाषा प्रगत होत गेल्या. त्यांची राहण्याची घरे, पाषाणांची आयुधे, शिकारीची तंत्रे, सामाजिक रितीरिवाज बदलत गेले. त्यांच्या धर्म संकल्पना, त्यांचे देव, देवांची रूपे, वस्त्रप्रावरणे, आयुधे यांच्यातही विविधता होती. अक्राळविक्राळ असे त्यांचे रूप होते. आपल्याकडे राक्षस, दैत्यांची जशी रूपे रंगविली जात होती तसे त्यांचे स्वरूप होते. जशी प्रगती अटलांटिक समुद्राच्या पूर्वेकडील भूभागात, आफ्रिका, आशिया, युरोप या खंडात होत गेली, साधारण त्याच प्रकारची प्रगती उत्तर आणि दक्षिण अमेरिका या खंडांमध्ये होत गेली. एक महत्वाचा फरक पडला. तो म्हणजे अटलांटिक समुद्राच्या पूर्वेकडील भूभागात केव्हा तरी चाकाचा शोध लागला. प्रथम दोन आणि नंतर चार चाकांना धरून चालणारी गाडी आणि त्याला माणसाळलेली जनावरे जोडून लांब पल्ला गाठण्याचे तंत्र प्रगत झाले. चाकाच्या शोधामुळे जी प्रगती पूर्वेकडील देशांत झाली, तेवढी प्रगती अमेरिका खंडात होऊ शकली नाही. तसेच अमेरिका खंडात घोड्यासारखे चपळ वाहन उपलब्ध नव्हते. त्यामुळे लष्करी हालचालींच्या वेगावर बंधने पडली. त्याला धरून युद्धतंत्रे विकसित झाली नाहीत.
सुमारे साडेपाचशे वर्षांपूर्वी जेव्हा गोऱ्यांचे ‘पांढरे पाय’ अमेरिकेला लागले, त्यावेळी बंदुकीसारखे दुरून अचूक माणसे टिपणारे परिणामकारक शस्त्र त्यांच्या जवळ होते. त्या शस्त्रांपुढे स्थानिक समाजांचा निभाव लागला नाही. अमेरिकेत अनेक ठिकाणी सोन्याच्या खाणी होत्या. त्यांचे महत्व स्थानिक जमातींना वाटत नव्हते, पण गोऱ्यांच्या जगात सोने हेच महत्त्वाचे चलन होते. त्यांना सोन्याची भयंकर हाव होती. तसेच अतिरेकी धर्मवेडाने ते भारले होते. त्यातून गोऱ्या आक्रमकांनी स्थानिकांचा वंशसंहार आरंभला.
प्युब्लो समुदाय
आमच्या ‘ला वेगा’ च्या प्रवासात काही स्थानिक जमातींच्या लोकांच्या संस्कृती संबंधित वस्तुसंग्रहालये पाहिली. आम्ही ओवरटोन या ठिकाणच्या ‘लॉस्ट सिटी’- लुप्त शहर वस्तुसंग्रहालयाला भेट दिली. तेथे सुमारे दहा हजार वर्षांपूर्वीपासून वस्ती करून असलेल्या प्युब्लो जमातीच्या लोकांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे पुरातत्वीय अवशेष होते. त्यांची रंगवलेली मातीची भांडी, त्यावरील सुंदर चित्र शैली, दगडाची अणकुचीदार औजारे, रंगीत दगडांच्या मण्यांच्या माळा, बांबूच्या दैनंदिन वस्तू, झोपडीवजा घरे बांधण्याची पद्धती आणि शिळांवरील चिन्हे या बरोबरच त्यांच्या घरांच्या समूहाची झलक इत्यादी गोष्टी तेथे पहायला मिळाल्या. ते लोक गुहांमध्ये रहात असत. त्यांच्या गुहाचित्रांच्या प्रतिकृती एका शिळेवर रेखाटल्या होत्या. त्या अर्वाचीन होत्या, हे स्पष्ट होते. सुमारे हजार वर्षांपूर्वी प्युबलो समुदाय अवर्षण आणि बहुधा साथीच्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे तो प्रदेश सोडून दक्षिणेस न्यू मेक्सिकोकडे स्थलांतरित झाला.
(लेखक पुरातन संस्कृती अभ्यासक आहेत.)