विनोदवीर सुप्रिमो हंबर्ट

कलाकार

Story: इजिदोर डांटस |
21st March 2020, 11:40 am


-------------------------
सुप्रिमो हंबर्ट यांनी तियात्रात एक विनोदी कलाकार म्हणून नाव कमावले आहे. त्यांचा जन्म २५ मार्च १९५६ रोजी मडगाव येथे झाला. होली स्पिरीट विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. तेथे तियात्र व्हायचे तेव्हा हंबर्ट यांना विनोदी भूमिकाच मिळायच्या. १९७२ साली प्रसिद्ध तियात्र कलाकार रुझारियो डायस प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. हंबर्टचे काम त्यांना आवडले. त्यांनी आपल्या ‘चूक हांवें आदारली’, ‘क्लियोपात्रा’ आणि ‘विस्वासघात’ या तियात्रांमध्ये त्याला घेतले. नंतर रस्तादाक अस्ताद या जाॅन क्लार, जेम्स फर्नांडिस यांच्या खेळ तियात्र व तियात्रांमध्ये त्यांनी काम केले.
१९७४ ते १९८४ पर्यंत हंबर्ट यांनी अबूधाबीमध्ये रामाडा हाॅटेलात काम केले आहे. नंतर गोव्यात लहान भाऊ प्रिन्स जेकब यांच्या ‘प्रिन्स जेकब प्राॅडक्शन्स’ मध्ये काम केले. त्यांची कामे लोकांना प्रचंड आवडली. ‘पिंजरे, पायणें, पावणेक, पेदो, पेरगांव, कागोत, पाद्री तियात्रात हंबर्ट आणि जेकब यांच्या भूमिका गाजल्या. ‘पाद्री’ तियात्राचे ३१५ हून अधिक प्रयोग झाले. प्रिन्स जेकबच्या ‘प' आद्याक्षरावरून सुरू होणाऱ्या पंचवीसही तियात्रात हंबर्टने काम केले आहे. ‘दुस्मानाक पासून निर्मिनाका’, ‘पाप तुजे प्राचीत म्हजें’, ‘आमचें कोण चिंता’, ‘सुखांत तशें दुखांत’, ‘पाद्री मनीस न्हय’ या तियात्रांमध्ये त्यांनी काम केले आहे. सॅम्युएल कार्व्हालो आणि विल्यम दे कुरतोरीं यांच्या तियात्रात त्यांनी काम केले आहे. फादर लुकास रिबेलो यांच्या तियात्रांमध्ये त्यानी युरोपात असताना पाच वर्षे काम केले आहे.
तियात्रांच्या १०० हून अधिक सीडींमध्ये हंबर्ट यांनी काम केले आहे. गोंय तें गोंय, हांवूंच फटोवलों, सभाव, व्हिवा गोवा या त्याच्या गायनाच्या ऑडियो कॅसेट गाजल्या आहेत. पाद्री, रडनाकाय आणि निर्मिलेलें निर्मोणे हे त्यांचे चित्रपट. हिंदी चित्रपट अभिनेते स्व. देवेन वर्मा यांनी त्यांना काॅमेडी सुप्रेमो हा किताब दिला होता. ‘आमचें नशीब’, ‘निर्मोण’ वगैरेंचे दिग्दर्शक स्व. ए. सलाम यांनीही त्यांचा गौरव केला होता.
पहिल्या इफ्फीत मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी त्यांना पुरस्कार प्रदान केला होता. २०१८ तला लंडन जीवनगौरव पुरस्कार, २०१३ चा सुनापरांत गोवा आर्टस अॅण्ड कल्चर यांचा मारिओ मिरांडा पुरस्कार, टाईम्स आॅफ इंडियाचा मार्च २०१५ मध्ये विनोदी गीत पुरस्कार, तियात्र अकादमीचा जीवनगौरव आदी अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. गेली ४८ वर्षे हंबर्ट तियात्रांमध्ये काम करत आहेत. सध्या ते फातोर्डा येथे राहतात. त्यांना शुभेच्छा.
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)