गोव्याच्या शिष्टमंडळाची पोर्तुगालच्या पाणी प्रकल्पाला भेट


10th February 2018, 05:08 am

विशेष प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ पोर्तुगाल दौऱ्यावर गेले आहे. या शिष्टमंडळाने त्याठिकाणी सांडपाणी प्रक्रिया आणि पाणी प्रक्रिया प्रकल्पाला भेटी दिल्या.
सांडपाणी वाहिन्यांची जोडणी व सांडपाणी व्यवस्थापन तसेच पाणी प्रक्रिया प्रकल्प व पिण्याच्या पाण्यासाठीच्या घरोघरी जोडणी देण्यात पोर्तुगाल अग्रेसर आहे. तेथील या दोन्ही व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ पोर्तुगालच्या दौऱ्यावर गेले आहे.
मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात माहिती तंत्रज्ञान खात्याचे रवी झा, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव व विज्ञान तंत्रज्ञान खात्याचे संचालक लेविन्सन मार्टिन्स, अधीक्षक अभियंता रायकर, सहाय्यक अभियंता नालास्को परेरा यांचा समावेश आहे.
लिस्बन शहरातील व इतर परिसरातील प्रकल्पांची पाहणी या शिष्टमंडळाने केली. विशेषत: भूमिगत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी केली. पोर्तुगाल सरकारची कंपनी या प्रकल्पाचे व्यवस्थापन पाहत असून ती सध्या नफ्यात आहे. पिण्याच्या पाण्यासह सांडपाण्याचे व्यवस्थापन ही कंपनी पाहते.
शिष्टमंडळाने भारतीय राजदुतांच्या उपस्थित पोर्तुगालच्या पर्यावरण व विदेश व्यवहार मंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. पोर्तुगाल पाणी व्यवस्थापन आणि सांडपाणी प्रक्रिया करण्यात अग्रेसर असल्यामुळे पोर्तुगालच्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून हे शिष्टमंडळ सरकारला अहवाल देणार आहे.