आरोग्य सुविधा सुधारणेत गोवा द्वितीय

नीती आयोगाचा अहवाल जाहीर


10th February 2018, 03:58 am

विशेष प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : नीती आयोगाने राज्यांचा आरोग्य क्षेत्राविषयीचा अहवाल जाहीर केला आहे. लहान राज्यांच्या विभागात आरोग्य क्षेत्रात सुधारणा करण्यात गोवा दुसऱ्या क्रमांकावर आहे. मिझोरम आणि गोवा या दोनच राज्यांमध्ये मागील वर्षींच्या तुलनेत जास्त सुधारणा झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

हा अहवाल २०१४-१५ व २०१५-१६ सालातील स्थितीबाबतचा आहे. नीती आयोगाने ‘सदृढ राज्ये, विकसित भारत’ या विषयावर तयार केलेल्या अहवालात आठ लहान राज्यांमध्ये गोवा दुसऱ्या क्रमांकावर आहे. पीएलएचआयव्ही-एआरटी सुविधा, एएनसी नोंदणी, सामाजिक आरोग्य केंद्र अशा वेगवेगळ्या विभागांत राज्यांच्या आरोग्य सुविधा सुधारणेचा आढावा घेऊन नीती आयोग हा अहवाल तयार करत असते. मोठ्या राज्यांमध्ये झारखंड, जम्मू व काश्मीर आणि उत्तर प्रदेश ही तीन राज्ये सर्वात पुढे आहेत, तर केरळ, पंजाब, तामिळनाडू ही राज्ये एकूण सुधारणेत पुढे आहेत.

मणिपूर, गोवा, मेघालय सर्वात जास्त सुधारित
अहवालानुसार, मणिपूर, गोवा, मेघालय आणि मिझोरम या चार राज्यांमध्ये सकारात्मक विकास दिसून आला आहे, मात्र सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा आणि नागालँड या चार राज्यांमध्ये विकास दिसून आलेला नाही. सुधारणा न झालेले, कमी सुधारित, माफक सुधारित आणि सर्वात जास्त सुधारित अशा चार गटांत राज्यांना विभागले जाते. त्यात मणिपूर, गोवा आणि मेघालय ही तीन राज्ये सर्वात जास्त सुधारित असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.