सांकवाळ कलाभवनाचे अपूर्णावस्थेतील बांधकाम वर्षभरात पूर्ण करणार

सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांची माहिती


10th February 2018, 04:04 am
सांकवाळ कलाभवनाचे अपूर्णावस्थेतील बांधकाम वर्षभरात पूर्ण करणार

प्रतिनिधी। गोवन वार्ता
वास्को : सांकवाळ पठारावर अपूर्ण अवस्थेत असलेल्या कलाभवनाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी राज्य कला व सांस्कृतिक खाते प्रयत्नशील आहे. येत्या काही दिवसांत कलाभवानाचे काम सुरू करून ते वर्षभरात पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती कला व सांस्कृतिक खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी दिली.
मंत्री गावडे यांनी शुक्रवारी सकाळी कलाभवनाला भेट देऊन तेथील पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्या समवेत आमदार एलिना साल्ढाणा, कला व सांस्कृतिक खात्याचे सचिव गुरुदास पिळर्णकर, सांकवाळचे सरपंच गिरीष पिल्ले, पंच गोविंद लमाणी उपस्थित होते.
सांकवाळ पठारावर असलेल्या कलाभवनाचे बांधकाम २००८ मध्ये सुरू करण्यात आले होते. आरंभी बांधकामाला वेग देण्यात आला होता. परंतु, नंतर काही कारणास्तव काम ठप्प झाले ते अद्याप सुरू करण्यात आले नाही. यापूर्वी कला व सांस्कृतिक खात्याचे मंत्री दयानंद मांद्रेकर यांनीही कलाभवनाला भेट देऊन बांधकाम लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, काम पुन्हा सुरू झालेच नाही. त्यामुळे कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा यांनी याप्रकरणी लक्ष घालून हे बांधकाम सुरू व्हावे यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नामुळे मंत्री गावडे यांनी कलाभवनाच्या कामाची दखल घेतली होती. कलाभवन अपूर्णावस्थेत असल्याने तेथे काहीजणांचा अड्डा झाल्याने त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी तेथे सुरक्षा रक्षक नेमण्याची सूचना गावडे यांनी केली. कलाभवनाची पाहणी केल्याबद्दल आमदार साल्ढाणा यांनी समाधान व्यक्त केले. तसेच कलाभवनाचे काम लवकरच मार्गी लागेल अशी आशा व्यक्त केली.
बांधकाम अपूर्णावस्थेत; इमारतीची दुर्दशा
कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी शुक्रवारी सकाळी कलाभवनाला भेट देऊन तेथील पाहणी केली. यावेळी कलाभवनामध्ये अनेक त्रुटी दिसून आल्याने गावडे यांनी त्यासंदर्भात कंत्राटदाराकडे विचारणा केली. हे बांधकाम गेली सात-आठ वर्षे अपूर्णावस्थेत असल्याने इमारतीची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे योग्य सल्लागाराच्या निरीक्षणाखाली काम पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी स्पष्ट केले.