अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा मुष्टिफंडच्या विद्यार्थ्यांशी संवाद


10th February 2018, 04:03 am
अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा मुष्टिफंडच्या विद्यार्थ्यांशी संवाद


पणजी : पणजी येथील मुष्टिफंड संस्थेच्या मराठी प्राथमिक विद्यालयातील मुलांशी ज्येष्ठ कलाकार दिलीप प्रभावळकर यांनी विद्यालयाच्या श्रीनिवास धेंपो सभागृहामध्ये मनमोकळा संवाद साधला. गेले वर्षभर वाचन उपक्रमांतर्गत दिलीप प्रभावळकर यांची छोट्यांसाठीची पुस्तके मुलांना वाचनासाठी दिली होती. यात प्रामुख्याने ‘काॅलनीतल्या गोष्टी’ आणि ‘बोक्या सातबंडे’ (दहा भाग) या पुस्तकांचा समावेश करण्यात आला होता. यातून मुलांची वाचनाची आवड वाढण्यास ही पुस्तके जास्त उपयुक्त ठरली. त्यामुळे संस्थेचे उपाध्यक्ष डाॅ. अजय वैद्य यांनी मुलांसाठी त्यांना बोलावण्याचे ठरवले व त्याप्रमाणे कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अनिल खंवटे, खजिनदार दिलीप धारवाडकर, उपाध्यक्ष डाॅ. अजय वैद्य, दोन्ही विद्यालयांच्या मुख्याध्यापिका स्नेहा सरदेसाई व रत्ना पुराणिक उपस्थित होत्या. यावेळी मुलांनी प्रभावळकर यांना ‘लेखन केव्हा सुरू केले, असा प्रश्न विचारताच आपल्या एवढाच नऊ-दहा वर्षांचा असताना आपण लेखनास सुरुवात केली, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर ‘बोक्या सातबंडे’ मधील कथांवर आधारित मुलांनी प्रश्न विचारले. अद्याप प्रकाशित न झालेली एक विनोदी कथाही त्यांनी मुलांना वाचून दाखवली. सुमारे दीडतास हा कार्यक्रम रंगला. यावेळी शिक्षकांनीही प्रभावळकर यांना काही प्रश्न विचारले.
संस्थेचे अध्यक्ष अनिल खंवटे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मुष्टिफंड संस्थेचा इतिहास सांगणारे पुस्तक संस्थेचे खजिनदार दिलीप धारवाडकर यांनी भेट दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. अजय वैद्य यांनी केले, तर आभार मुख्याध्यापिका स्नेहा सरदेसाई यांनी मानले.