गोवा शिपयार्डने घेतला ११, ५०० चौ. मी. भूखंड

गोवा औद्योगिक विकास महामंडळाकडे लीज करार


10th February 2018, 04:06 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता
वास्को : येथील गोवा शिपयार्ड लिमिटेडने आपल्या विस्तारिकरणासाठी एक पाऊल पुढे टाकताना झुआरी नगर येथील सांकवाळ औद्योगिक वसाहतीतील ११,५०० चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड ताब्यात घेतला. यासंबंधी गोवा औद्योगिक विकास महामंडळाकडे लीज करार करण्यात आला. हा भूखंड पूर्वी मेसर्स उमीकोर आनंदेया इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या ताब्यात होता. या भूखंडावर सुमारे ४,८०० चौरस मीटर क्षेत्रफळाची फॅक्टरी इमारत आहे.
लीज करारावेळी गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक निवृत्त रिअर अॅडमिरल शेखर मित्तल उपस्थित होते. सांकवाळ औद्योगिक वसाहतीमध्ये गोवा शिपयार्डने यापूर्वी तीन युनिट्स ताब्यात घेतल्या आहेत. नव्याने ताब्यात घेण्यात आलेला हा भूखंड सर्वात मोठा असल्याचे त्यांनी सांगितले. गोवा शिपयार्डचा वाढता आलेख लक्षात घेता, विशेषत: एनसीएमव्ही प्रकल्प व नौदलासाठी युद्ध नौका बांधण्याच्या प्रकल्पासाठी पायाभूत सुविधांची मोठी गरज होती. सुमारे ४७ हजार कोटीच्या प्रकल्पांसाठी भारतीय नौदलाने गोवा शिपयार्डची निवड केली आहे. गोवा शिपयार्डच्या विस्तारिकरणामुळे गोव्यातील नवीन उद्योजकांना प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे. एकंदर या गोष्टींमुळे गोव्याच्या आर्थिक स्थितीला व नवीन रोजगार उपलब्ध होण्यास पाठबळ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गोवा शिपयार्डची कामगिरी दिवसेंदिवस उंचावत आहे. गोवा शिपायर्डच्या इतिहासात २०१७-१८ चे उत्पादक मूल्य १४०० कोटींवर जाण्याची शक्यता आहे. मागील वर्षापेक्षा हे उत्पादक मूल्य ४० टक्क्यांपेक्षा अधिक असेल. गोवा शिपयार्डच्या कामगिरीची दखल घेऊन गोवा शिपयार्डला अधिकाअधिक कामे मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सांकवाळ औद्योगिक वसाहतीमध्ये घेण्यात आलेल्या युनिटमध्ये काही फेरफार तसेच नूतनीकरण करण्यात आल्यावर त्या युनिटचे काम सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.