काणकोणात मोबाईल चोरीच्या प्रकारांत वाढ

तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांची टाळाटाळ


09th February 2018, 05:01 am


प्रतिनिधी। गोवन वार्ता
काणकोण : काणकोणात दर शनिवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात रात्रीच्यावेळी भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांचे मोबाईल चोरण्याच्या प्रकारात या दिवसांत वाढ झाली आहे. मात्र, काणकोण पोलिस मोबाईल चोरीची तक्रार दाखल करून घेण्यासाठी साहेबांची परवानगी पाहिजे, असे सांगून तक्रारदाराला माघारी पाठवित असल्याच्या येथील नागरिकांच्या वाढत्या तक्रारी आहेत.
यासंबंधी मास्तीमळ येथील नागरिक दत्तप्रसाद खोलकर यांनी काणकोणात पत्रकार परिषदेत सांगितले की, दि. ३ फेब्रुवारी रोजी रात्री ८ च्या सुमारास आपण चावडी बाजारात खरेदीसाठी गेलो असता एका व्यक्तीने गर्दीचा फायदा घेऊन आपल्याला धडका दिली आणि एका क्षणात खिशातला मोबाईल लंपास केला. यावेळी खोलकर यांनी आठ दिवसांपूर्वीच २० हजार रुपये किमतीचा मोबाईल खरेदी केल्याची माहितीही पत्रकारांना दिली.
अशाच प्रकारे आणखी दोन ग्राहकांचे मोबाईल त्याच दिवशी चोरण्याचे प्रकार घडले. पण पोलिस तपास शून्य असल्याच्या येथील नागरिकांच्या वाढत्या तक्रारी आहेत. चोरीला गेलेल्यांचे मोबाईल नंबर ट्रॅकिंगवर टाकले असते तर मोबाईल चोर सापडले असते, असे येथील एक ज्येष्ठ नागरिक पांगा गोविंद नाईक देसाई यांनी सांगितले.
फोटो : मोबाईल चोरीची माहिती देताना दत्तप्रसाद खोलकर. (संतोष गावकर)