राॅय नाईक यांना समन्स जारी

बेकायदा खाण प्रकरण : दि. ९ रोजी होणार चौकशी


07th February 2018, 05:17 am

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : बेकायदा खाण प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) माजी मुख्यमंत्री तथा फोंडाचे आमदार रवी नाईक याचे पुत्र राॅय नाईक यांना समन्स जारी करून शुक्रवार ९ रोजी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
बेकायदा खाण प्रकरणी निवृत्त न्यायमूर्ती एम. बी. शहाच्या अहवालानुसार खाण संचालक प्रसन्न आचार्य यांनी एसआयटीकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार एसआयटीने माजी खाण संचालक अरविंद लोलयेकर, माजी खाण अधिकारी राॅबर्ट गोन्साल्वीस, शोभना रिवणकर, डि. के. भावे, बबन गावकर तसेच निवृत्त न्यायमूर्ती एम. बी. शहाच्या अहवालात असलेल्या संशयितांविरोधात भा.दं.सं. कलम ४०९, २१२, २०१, २१८, ४२०, ३७९, १२०बी, १६६, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, खाण आणि खनिजे विकास कायदा, खनिज संरक्षण व विकास नियम आणि गोवा प्रतिबंधक आणि बेकायदेशीर खाण परिवहन, स्टोरेज ऑफ मिनरल्स नियम २००४ नुसार २०१३ साली गुन्हा दाखल केला आहे.
बेकायदा खाण प्रकरणी आमदार रवी नाईक याचे पुत्र तथा राॅय नाईकची काय भूमिका आहे याची चौकशी करण्यासाठी नाईक यांना समन्स जारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.