जनमत कौल चौकात फ्ली-मार्केट सुरू करणार

नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांची माहिती


09th February 2018, 05:00 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : मडगाव शहरात नव्यानेच नामकरण करण्यात आलेल्या जनमत कौल चौकात लवकरच हंगामी फ्ली-मार्केट सुरू करणार असल्याची माहिती नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी गुरुवारी दिली. येथील नानूटेलमध्ये कार्निव्हल महोत्सवाचे आयोजन व पत्रकार परिषदेत दरम्यान मंत्री सरदेसाई पत्रकारांशी बोलत होते.
कळंगुटच्या समुद्र किनाऱ्यावर आठवड्यातून एक दिवस खास करून रात्रीच्या वेळी फ्ली-मार्केट भरविण्यात येते. सरकारतर्फे त्याच प्रकारे जनमत कौल चौकात फ्ली-मार्केट सुरू करण्याचा विचार आहे. त्या फ्ली-मार्केटमध्ये खास करून पुरातन काळातील वस्तू व हस्त कलेचे कोरीव काम केलेल्या वस्तूंची विक्री होणार आहे. त्याशिवाय तयार कपडे व अन्य वस्तूंचीही विक्री होणार आहे. दक्षिण गोव्यात अनेक पंचतारांकित हॉटेल्स आहेत. त्या तारांकित हॉटेलातील व्यवस्थापन हॉटेलात उतरणाऱ्या पर्यटकांना आठवड्यातून एक दिवस या फ्ली-मार्केट मध्ये घेऊन येणार आहेत. पर्यटन खात्याकडून तारांकित हॉटेल व्यवस्थापनांकडे त्याबाबतचा करार केला जाणार आहे.
या फ्ली-मार्केटात स्थानिक हस्त कलाकारांनी तयार केलेल्या कोरीव वस्तू विक्रीस ठेवल्या जाणार आहेत. फ्ली-मार्केटच्या निमित्ताने त्यांच्या वस्तू विदेशी पर्यटकांपर्यंत जाणार असून सरकारलाही थोडेफार उत्पन्न प्राप्ती होणार आहे. हे फ्ली-मार्केट आठवड्यातून कुठल्याही एके दिवशी भरविण्यात येणार आहे. जास्त करून उन्हाळा व हिवाळ्यात हे फ्ली-मार्केट सुरू राहणार आहेत. पावसाळ्यातील चार महिने फ्ली-मार्केट बंद ठेवले जाणार आहे.
यापूर्वी कोलवा येथे आठवड्यातून एक दिवस सोमवारी रात्रीच्या वेळी फ्ली-मार्केट भरविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कोलवात फ्ली-मार्केटला पर्यटकांकडून अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. जनमत कौलात फ्ली-मार्केट सुरू करणे आपला वेगळा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकाच्या देखरेखीबाबत लवकरच तोडगा
जनमत कौल चौकाची देखरेख करण्यासाठी दोन पर्याय निवडण्यात आले आहेत. या चौकात खासगी ठेकेदारांना नियुक्त करून देखरेखीचा ताबा त्यांच्याकडे देणे, अथवा पालिकेला देखरेखीचा ताबा देणे यावर विचार केला जात आहे. सध्या जनमत कौलाच्या चौकात पोलिस पहारा करीत आहेत. या चौकाच्या देखरेखीबाबत आपण लवकरच तोडगा काढणार आहे.