पोलिसांशी हुज्जत; ६ महिने कैद


07th February 2018, 04:17 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : येथील ओशिया संकुलात दोघा वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालून त्यांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली कोटा-कुंकळ्ळी येथील शुभम देसाई (२४) या दुचाकी चालकाला दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश बी.पी. देशपांडे यांनी ६ महिने कैदेची शिक्षा सुनावली आहे.
आरोपीला अनुसूचित जाती व जमातीबद्दल अपशब्द वापरून पोलिसांचा अपमान केल्यामुळे ५ हजार रुपये दंड व ६ महिने कैद. सरकारी नोकरांना ड्यूटीवर असताना अपमानित केल्याने २ हजार रुपये दंड व तीन महिने कैद. तसेच शिवीगाळ करून पोलिसांचा अपमान केल्याने १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आरोपीने या तिन्ही शिक्षा एकाचवेळी भोगावयाच्या आहेत. या जिल्हा न्यायालयाने गेल्या २ फेब्रुवारी रोजी आरोपीला दोषी ठरविण्यात आले होते.
या विषयीची अधिक माहिती अशी की, ही घटना २ जून २०१५ रोजी झाली होती. मडगाव वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कृष्णा गावकर व पोलिस शिपाई गणेश सैल हे ओशिया संकुलात सेवा बजावत असताना आरोपी जीए ०८-बी-६६१५ क्रमांकाच्या पल्सर दुचाकीने ओशिया संकुलात आला. वाहतूक पोलिसांनी त्याला अडवून त्याच्या वाहन परवान्याची तपासणी केली. या क्षुल्लक कारणावरून दुचाकी चालकाने विनाकारण वाहतूक पोलिसांशी वाद व हुज्जत घातली. तसेच शिवीगाळ करून जातीवाचक अपशब्द वापरून पोलिसांचा अपमान केला.
या प्रकरणी मडगाव शहर पोलिसांत वाहतूक पोलिस विभागाकडून अधिकृत तक्रार नोंदविण्यात आली होती. त्यानुसार शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध ३५३, ५०४ व जातीवाचक अपमान कायद्याच्या ३,१-एक्स कलमान्वये सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे अॅड. लाडिस्लांव फर्नांडिस यांनी युक्तिवाद केले.