वाळपईत दीड वर्षाच्या मुलाचा बादलीत पडून मृत्यू


07th February 2018, 05:18 am


प्रतिनिधी। गाेवन वार्ता
वाळपई : वाळपईत, म्हावूस गावाकडे जाणाऱ्या मार्गावर मंगळवारी सायंकाळी एका वाड्यावर दीड वर्षाच्या मुलाचे पाण्याने भरलेल्या बादलीत पडून दुर्दैवाने निधन होण्याचा प्रकार घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबतची माहिती अशी की, आफ्रोस मुनावर हुसेन हा दीड वर्षीय मुलगा घरात खेळत होता. यावेळी त्याची आई घरकामात व्यस्त होती, तर त्याचे वडील कामावर गेले होते. यावेळी मुलगा खेळताना पाण्याच्या बादली शेजारी गेला व त्यात पडला. बादलीत पडून गुदमरल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मुलगा दिसत नसल्यामुळे त्याच्या आईने शोधाशोध सुरू केली असता तो बादलीत पडल्याचे निदर्शनास येताच तिने मदतीसाठी शेजाऱ्यांना हाक दिली. शेजाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र, त्याचा कोणताही फायदा झाला नाही. यावेळी त्याला वाळपईच्या सरकारी सामाजिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
वाळपईच्या पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकाॅत पाठविण्यात आला आहे. या प्रकाराबाबत वाळपईत दुःखाचे छत्र पसरले असून या भागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.