शौचालयाची मोडतोड केल्या प्रकरणी गुन्हा

संशयिताकडून फिर्यादीला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी


09th February 2018, 05:03 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : नादोडावाडी येथील पांडुरंग देसाई यांच्या मालकीच्या शौचालयाची मोडतोड केल्या प्रकरणी तसेच त्यांना व त्यांच्या पत्नीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून म्हापसा पोलिसांनी तेथील सिद्धेश देसाई, शांतीदेसाई, बाबुश देसाई व कृष्णा देसाई यांच्याविरुद्ध दखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
म्हापसा पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार पांडुरंग देसाई यांनी १५ वर्षांपूर्वी सरकारी योजनेखाली पंचायतीचा रितसर परवाना घेऊन आपल्या राहत्या घराला लागून शौचालयाचे बांधकाम केले होते. त्याचा फिर्यादी देसाई कुटुंबीय वापर करीत असत.
२०१५ साली शौचालयाच्या विरोधात बाबुश देसाई यांनी न्यायालयात खटला दाखल केला होता व शौचालय मोडून टाकण्यासाठी आदेश देण्याची विनंती न्यायालयाला केली होती. न्यायालयाने दि. ३० नोव्हेंबर २०१६ रोजी आदेश देऊन बाबुश देसाई यांचा अर्ज फेटाळून लावला होता. परंतु, गेल्या डिसेंबर २०१७ मध्ये संशयितांनी पांडुरंग देसाई यांच्या शौचालयाची मोडतोड केली.
फिर्यादी पांडुरंग देसाई यांचे वय ८५ वर्षे असून त्यांच्या पत्नीचे वय ७७ वर्षे आहे. त्यांना जवळचे असे कोणीच नाही. शौचालयाची मोडतोड केल्याने त्यांची गैरसोय होत आहे. त्यांनी सामान आणून संडासाची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतु, संशयित आरोपी शौचालयाच्या दुरुस्तीला विरोध करीत असून त्यांचा छळ करीत असून शिवीगाळ, मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
म्हापसा पोलिसांनी या प्रकरणी वरील संशयितांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ४४७, ५०६ (२) व ४२७ कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान पांडुरंग देसाई यांनी याबाबतीत गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. शांती देसाई यांनी केलेल्या तक्रारीवरून नादोडा पंचायतीने पांडुरंग देसाई यांच्यावर नोटीस बजावून शौचालयाचे बांधकाम बंद ठेवण्याचा व त्यासंबंधीची कागदपत्रे पंचायतीत सादर करण्याचा आदेश दिला आहे.