हणजूण येथे गांजा जप्त

एकास अटक व सुटका


09th February 2018, 04:58 am



प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : गुन्हा अन्वेषण विभागाकडून हणजुणे येथे बुधवारी रात्री छापा घालून ३५ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी स्थानिक नागरिक संशयित राधाकृष्णा नाईक याला अटक केली आहे. मात्र न्यायालयाने स्वतःच्या हमीवर त्याची सुटका केली.
गुन्हा अन्वेषण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संशयित राधाकृष्ण नाईक अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलिस उपनिरीक्षक मार्लोन डिसोझा यांनी पोलिस पथकासह बुधवारी सायं. ६.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत हणजूणे-प्राईजवाडा येथील पायरेट कॅफेजवळ छापा मारला. यावेळी पोलिसांनी नाईक याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. यावेळी त्यांच्याजवळ ०.८ ग्रॅम चरस आणि २००.१० ग्रॅम गांजा मिळून ३५ हजार रुपये किमतीचा अमली पदार्थ सापडला. त्यानंतर पोलिसांनी अमली पदार्थ जप्त केला तसेच संशयिताला अटक केली. अटक केलेल्या संशयिताला पोलिस कोठडीसाठी म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची स्वतःच्या हमीवर सुटका केली आहे.
या प्रकरणी विभागाने संशयित नाईक याच्या विरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या कलम २०(बी) ए नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक मार्लोन डिसोझा, उपनिरीक्षक अॅडविन डिसा, सुजय कोरगावकर आणि पोलिस कॉन्स्टेबल विनय श्रीवास्तव यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी उपनिरीक्षक डिसोझा पुढील तपास करीत आहेत.