वन्य जीवांच्या उपद्रवाचा आराखडा रखडला

बिबटे, गवे, हत्ती, शेकरू आणि माकड यांसारख्या वन्य प्राण्यांचा मानवीवस्तीत येण्याचा वावर दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या समस्येवर उपाययोजना सुचवणारा आराखडा सादर करण्यासाठी गोव्याच्या वन खात्याने एका वर्षापूर्वी डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेला पत्र लिहिले होते. मात्र, अद्यापपर्यंत संस्थेने आराखडा सादर केलेला नाही, अशी माहिती वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

06th October, 11:43 pm
वन्य जीवांच्या उपद्रवाचा आराखडा रखडला

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
बिबटे, गवे, हत्ती, शेकरू आणि माकड यांसारख्या वन्य प्राण्यांचा मानवीवस्तीत येण्याचा वावर दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या समस्येवर उपाययोजना सुचवणारा आराखडा सादर करण्यासाठी गोव्याच्या वन खात्याने एका वर्षापूर्वी डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेला पत्र लिहिले होते. मात्र, अद्यापपर्यंत संस्थेने आराखडा सादर केलेला नाही, अशी माहिती वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.
डेहराडून येथील वन्यजीव संस्था सध्या अनेक प्रकल्पांच्या अभ्यासात व्यस्त आहे. या संस्थेकडे संशोधन तसेच इतर अनेक जबाबदाऱ्या आहेत. मानव-वन्यजीव संघर्षावर उपाययोजना सुचवण्यासाठी प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करावी लागते, त्यामुळे हा आराखडा सादर करण्यास उशीर होत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
गोव्यात म्हादई, भगवान महावीर आणि मोले या भागात अभयारण्ये आहेत. अभयारण्यालगतच्या परिसरात वन्य प्राण्यांचा वावर वाढण्याची शक्यता अधिक असते. विकास आणि लोकसंख्या वाढेल, तसतसा वन्य प्राण्यांचा मानवीवस्तीत येण्याचा धोका वाढणार आहे, असे वन खात्याचे अधिकारी जीस वर्की यांनी सांगितले. यामुळेच भविष्यातील धोके लक्षात घेऊन उपाययोजनांचा आराखडा मागवणारे पत्र वन खात्याने पाठवले आहे. हा आराखडा प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाहीची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पाणी, जागेअभावी वन्यप्राणी लोकवस्तीत
राज्याची लोकसंख्या आणि विकास झपाट्याने वाढत आहे. नवीन रस्ते, पूल आणि इमारतींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांना जंगलात वावरण्यासाठी पुरेशी जागा उरलेली नाही. सध्या उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या शोधात हे प्राणी अनेकदा लोकवस्तीत घुसतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आता तर गोव्यात ठिकठिकाणी बिबट्यांचे दर्शन घडू लागले आहे.
शेती, पाळीव प्राण्यांचे मोठे नुकसान
बिबट्यांनी मानवीवस्तीत घुसून कुत्रे किंवा पाळीव गुरांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सत्तरी आणि इतर भागात गव्यांनी माणसांवर केलेले हल्ले गंभीर ठरले आहेत. दुसरीकडे, माकडे आणि शेकरू यांच्यामुळे शेती व बागायतीचे मोठे नुकसान सुरूच आहे. वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीत वाढता वावर गंभीर समस्या बनली आहे. दरम्यान, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास सरकारने नुकसानभरपाईच्या रकमेत वाढ केली आहे.