म्हापसा : कळंगुट येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली कळंगुट पोलिसांनी दिबेंदू मोंडल (३१ वर्षे, रा. पश्चिम बंगाल) या युवकाला अटक केली आहे. संशयिताने फुस लावून गोव्यातून पळवून नेलेल्या पीडित मुलीची पोलिसांनी मुंबईटतून सुटका केली होती.
सोमवारी ५ रोजी पोलिसांनी मुंबई येथून पीडितेची सुटका करून गोव्यात आणल्यावर तिची बांबोळी येथील गोवा वैद्यकिय इस्पितळात वैद्यकिय तपासणी करण्यात आली. या वैद्यकीय तपासणीत पीडितेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्यात पॉक्सो कायदा कलम जोडत संशयित युवकाला मंगळवारी ६ रोजी सायंकाळी अटक केली आहे.
दरम्यान, ही पीडित अल्पवयीन मुलगी शाळेतून बेपत्ता होण्याचा हा प्रकार २९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ च्या सुमारास घडला होता. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी लागलीच गुन्हा नोंदवून पीडित बेपत्ता मुलीचा शोध सुरू केला असता ती पश्चिम बंगालमधील एका युवकासोबत असल्याचे पोलीस तपासात आढळून आले होते. या युवकानेच पीडितेचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करून पोलिसांनी या दोघांचा माग काढला आणि मुंबई येथे ती आल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी मुंबई येथे जाऊन या दोघांनाही तेथील स्थानिक पोलिसांच्या साहाय्याने पकडून गोव्यात आणले होते.
तसेच पीडितेसोबत असलेल्या दिबेंदू मोंडल याला भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम 35(3) अंतर्गत नोटीस बजावण्याली होती. या युवक सकाळी पोलीस स्थानकात चौकशीसाठी हजर राहिला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व नंतर रितसर गुन्ह्याखाली अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.
संशयित सांगोल्डातील गाळ्यावर होता हेल्पर
संशयित आरोपी दिबेंदू मोंडल हा सांगोल्डा येथील एका गाळ्यावर हेल्पर म्हणून नोकरी करत होता. या नोकरीच्या दरम्यान पीडित युवती त्याच्या संपर्कात आली व नंतर संशयिताने तिला आपल्या प्रेमाच्या जाल्यात ओढले आणि तिला फुल लावून पळवून नेले होते.


