भाजपविरोधात लढण्यासाठी गोमंतकीयांना ‘ग्रॅंड अलायन्स’ हवी : विजय सरदेसाई

‘ग्रॅंड अलायन्स’साठीच गोवा फॉरवर्ड,आपचे गोवाभरातील होर्डिंग्ज काढले :भाजपविरोधात लढण्यासाठी गोमंतकीयांना सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन ‘ग्रॅंड अलायन्स’ केलेली हवी आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेस पक्षाला बाहेेर ठेवून किंवा त्यांना लक्ष्य करून अशी अलायन्स होऊ शकत नाही. ‘ग्रॅंड अलायन्स’ करण्यासाठीच गोवा फॉरवर्ड पक्ष आणि आपचे गोवाभरातील होर्डींग्ज काढण्यात आले असल्याचे गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते तथा आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
18 mins ago
भाजपविरोधात लढण्यासाठी गोमंतकीयांना ‘ग्रॅंड अलायन्स’ हवी : विजय सरदेसाई

पणजी : भाजपविरोधात लढण्यासाठी गोमंतकीयांना सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन ‘ग्रॅंड अलायन्स’ केलेली हवी आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेस पक्षाला बाहेेर ठेवून किंवा त्यांना लक्ष्य करून अशी अलायन्स होऊ शकत नाही.  ‘ग्रॅंड अलायन्स’ करण्यासाठीच गोवा फॉरवर्ड पक्ष आणि आपचे गोवाभरातील होर्डींग्ज काढण्यात आले असल्याचे गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते तथा आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.

गोवा फॉरवर्ड पक्ष आणि आम आदमी पक्षाचे लावण्यात आलेले गोवाभरातील होर्डिंग्ज काढण्यात आल्यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता; आमदार सरदेसाई यांनी वरील माहिती दिली.  गोवा फॉरवर्ड पार्टी आणि आपने एकत्र येऊन लावलेल्या  होर्डिंग्जवर ‘काँग्रेस आणि भाजपने तुम्हाला दोनदा फसवले तिसऱ्यांदा; फसू देऊ नका’ असा संदेश देण्यात आला होता.

त्याचबरोबर आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी एकत्र येऊन ‘गोवा फर्स्ट’ची घोषणा करीत २०२७ ची विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्याची घोषणा केली होती. त्यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता; भाजपासारख्या पक्षाचा विधानसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ‘ग्रॅंड अलायन्स’ करावी अशी गाेमंतकीय जनतेची भावना आहे.

गोमंतकीयांना काय आवडते आणि काय हवे हे पाहणे आपले कर्तव्य आहे. अर्थकारणाचे काही नियम असतात. आर्थ‌िक उलाढालीत ग्राहक हा राजा असतो. आंबे आणले आणि हापूस, दिल्लीतून दशेरा आणून गोव्यात विकायला लागले तर गोमंतकीय ते घेणार नाहीत. गोमंतकीय मानकुराद आंबे शोधणार ते मग गोव्यातील कुठलेही असोत. गोमंतकीय मानकुरादच खरेदी करणार. तसेच राजकारणात मतदार हाच राजा असतो.

आणि गोमंतकीयांना भाजपविरोधात लढण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची ‘ग्रॅंड अलायन्स’ हवी आहे. स्वाभीमानी गोमंतकीयांची सर्व विरोधी राजकीय पक्षांनी एकत्र यावे, हीच तीव्र भावना आहे.  राजकारणात जनतेला, मतदारांना जे काही हवे तेच निर्णय घ्यावे लागतात. स्वाभीमानी गोमंतकीयांना वाटते की, सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येेऊन ‘शित, कडी’ खावी. महाग झालेली ‘शित कडी’ स्वस्त करावी.

आपल्याला दिल्लीत काय घडले किंवा इतरत्र काय घडले हे आपल्याला पडून गेलेले नाही. गोमंतकीयांना काय हवे ते आपण पाहतो.  जनतेला हवे ते निर्णय न घेतल्यास सर्वात जास्त शिव्या आपल्याला खाव्या लागतात कारण विजय सरदेसाई किंवा गोवा फॉरवर्ड पक्षाकडून जनतेच्या जास्त अपेक्षा आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधात लढण्यासाठी जनतेच्या अपेक्षेप्रमाणे ‘ग्रॅंड अलायन्स’ करण्यासाठीच गोवाभरातील गोवा फॉरवर्ड आणि आपचे होर्ड‌िंग्ज, बॅनर काढण्यात आले आहेत. ‘ग्रॅंड अलायन्स’नुसार आता नवे होर्डिंग्ज, बॅनर लावण्यात येणार. आपलाही सोबत घेऊन ही ‘ग्रॅंड अलायन्स’ आणखी वाढवण्यात येणार असल्याचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले.

पितृपक्षामुळे जास्त बोलू इच्छित नाही

कॉंग्रेससोबत युतीची बोलणी सुरू झाली का? यासंदर्भात विचारले असता; सध्या पितृपक्ष चालू असल्याने आपण त्यावर जास्त बोलू इच्छित नाही. मात्र, दिशेने पावले सुरू आहेत. पितृपक्षात कॉंग्रेसकडून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांची स्थिती काय झाली ते आपण पाहत आहे. आपली पत्नीही आपल्याला यासंदर्भात सांगत असते. त्यामुळे सर्वांचे ऐकून घेेऊन निर्णय घ्यावे लागत असल्याचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले.


हेही वाचा
सर्व पहा