पणजी : आप आणि गोवा फॉरवर्डची एकत्रित होर्डिंग्स काढण्यात आल्यानंतर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी भाजप विरोधात गोमंतकियांच्या इच्छेप्रमाणे ‘ग्रँड एलायन्स’ करण्याबाबत अनुकूलता दर्शविली आहे. पितृ पक्षानंतर गोमंतकीयांना हवे असलेले नवीन होर्डिंग्ज, बॅनर्स दिसतील, असे सूचक वक्तव्य त्यानी केले आहे. यामुळे काँग्रेस-आरजी आघाडीत गोवा फॉरवर्डही सामील होणार आहे. मात्र आपने भाजपसह काँग्रेसवरील टीका सुरूच ठेवल्याने ‘ग्रँड एलायन्स’मध्ये आपच्या सहभागाबद्धल प्रश्नचिन्ह कायम आहे.
विधानसभा निवडणूक जवळ पोचल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पितृ पक्ष संपल्यानंतर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अनेक समीकरणे वा घडामोडी होतील, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
चतुर्थीच्या पूर्वदिनी आप व गोवा फॉरवर्ड यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ‘गोवा फस्ट‘ आघाडी जाहीर केली होती. यावेळीही आपचे राष्ट्रीय संघटक अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. यानंतर गोवा फस्टचे होर्डिंग्स ठिकठिकाणी लावण्यात आले होते. दुसऱ्या बाजूने काँग्रेस व आरजी यांचीही युतीबाबत बोलणी झाली. विधानसभा निवडणूक काँग्रेस-आरजी एकत्रितपणे लढविणार असल्याचेही दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी जाहीर केले होते.
भाजप विरोधातील समविचारी पक्षांकडे युती करण्यास काँग्रेस तयार असल्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे तसेच प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. त्यावेळी गोवा फॉरवर्डने युती बाबत काँग्रेसला प्रतिसाद दिला नव्हता. आता मात्र पितृपक्षा नंतर गोमंतकियांना हवे असलेले होर्डिंग्स दिसतील, असे सुतोवाच गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केले आहे. यामुळे काँग्रेस-आरजी -गोवा फॉरवर्ड यांच्या युतीबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे.
विजय सरदेसाई यांच्या वक्तव्यानंतर आपने मात्र भाजप-काँग्रेस यांच्या ‘जॉईंट वेंचर’ला आपचा कायम विरोध असेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यामुळे आप ग्‘रँड एलायन्स’मध्ये सहभागी होणार नाही, अशी सध्याची स्थिती आहे.
विजयकडून एलायन्सबाबत प्रस्ताव हवा : वीरेश बोरकर
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्या भूमिकेमध्ये वारंवार बदल होत असतो. एलायन्स बाबत रीतसर प्रस्ताव त्यांनी सादर करायला हवा. त्यांच्या प्रस्तावावर विचार करून आम्ही निर्णय घेऊ. भाजप विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याची आमची भूमिका कायम असल्याचे आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी सांगितले.


