वास्को : सडा येथील प्रसिद्ध ‘मुरगावचा राजा’ गणेशोत्सवासाठी उभारण्यात आलेला मंडप गणेशोत्सव समितीने स्वतःहून हटवला. पालिका प्रशासनाच्या सूचनेनंतर समितीने पुढाकार घेत मंडप काढण्याचे काम हाती घेतले.
नगरपालिका अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तसेच समितीच्या सहकार्याने मंडप हटविण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली.
मंडप हटविण्याच्या प्रक्रियेत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य केले. त्यामुळे नगरपालिका प्रशासन आणि गणेशोत्सव समिती यांच्यात समन्वय राखत ही कारवाई शांततेत पूर्ण झाली.
वरील शेड ७ ऑक्टोबरपर्यंत पूर्णपणे पाडण्यात यावी, असा आदेश गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने मुरगाव नगरपालिकेच्या मुख्याधिका दिला होता. मुरगाव बंदर प्राधिकरणाने (एमपीए) सदर शेड बेकायदेशीर असल्याचे नमूद करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने ९ सप्टेंबर २०२५ रोजी शेड पाडण्याचे आदेश दिले होते. आणि प्रशासनाला सहा आठवड्यांची मुदत दिली होती.
मात्र, २० ऑक्टोबर २०२५ रोजी ही मुदत संपूनही कोणतीही कारवाई न झाल्याने एमपीएने उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. त्यानंतरच्या विविध सुनावण्यांदरम्यान २७ जुलै आणि २८ ऑगस्ट रोजी कारवाईच्या तारखश निश्चित करण्यात आल्या होत्या, परंतु प्रशासनाकडून प्रत्यक्ष कारवाई पूर्ण होऊ शकली नाही. विलंबाबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत शेडचा वीजपुरवठा तीन दिवसांत खंडित करण्याचे निर्देश वीज विभागाला दिले होते.
मुरगाव नगरपालिकेकडून शेड पाडण्यास विलंब होत असल्याचे दिसून येताच उच्च न्यायालयाने ७ ऑक्टोबरची मुदत निश्चित केली होती. त्यानुसार आज वरील शेड पाडण्यात आली.


