गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
कळंगुट येथील साल्ढाणा किरण पार्क या निवासी संकुलात अनधिकृतपणे चालणारे व्यावसायिक फ्लॅट तीस दिवसांत सील करण्याचे निर्देश मानवाधिकार आयोगाने पर्यटन खात्याला दिले आहेत. या संकुलातील सविता यादव यांच्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तक्रारीत सुरक्षिततेसंबंधी प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
आयोगाने पर्यटन खाते, कळंगुट पंचायत आणि उत्तर गोवा पोलीस अधीक्षक यांना प्रतिवादी केले होते. तक्रारीत म्हटले होते की, संकुलातील १५६ पैकी सुमारे ४६ फ्लॅट्स पर्यटकांना अल्पमुदतीच्या भाड्याने दिले जातात. जिथे एकावेळी १० पेक्षा जास्त लोक राहतात. परिसरात ड्रग्जचा वापर आणि वेश्याव्यवसाय सुरू असल्यामुळे, तसेच अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर धमक्या मिळत असल्याने भीतीचे वातावरण आहे. यावर आयोगाने येथे अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रहिवाशांच्या मानवाधिकार उल्लंघनाची घटना घडली आहे, असा निष्कर्ष काढला.
‘गोवा नोंदणीकृत पर्यटन व्यापार कायदा, १९८२’ अंतर्गत फ्लॅटची नोंदणी करण्यापूर्वी त्या फ्लॅटचे वीज मीटर व्यावसायिक वापराचे असल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक करावे, अशी शिफारस आयोगाने केली आहे. संकुलात गेस्ट हाऊस चालवण्यासाठी ‘ना-हरकत’ दिले नसल्याचे स्पष्ट करणाऱ्या कळंगुट पंचायतीला पंचायत राज कायदा, १९९४ च्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय निवासी संकुलात बेकायदेशीर गोष्टींवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी रहिवाशांच्या तक्रारींवर त्वरित कारवाई करावी, असे निर्देश दिले आहेत.


