टपाल तिकिटाचे प्रकाशन करताना लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर. (नारायण पिसुर्लेकर)
गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
गोवा लहान राज्य असले तरी देशाच्या विविध भागांतील लाखो लोकांना ते रोजगार देत आहे. त्यामुळे ‘विकसित भारत’ घडवण्यासाठी गोव्याचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरेल. राज्य लहान असल्याने जनतेच्या समस्या ऐकून त्या सोडवण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींवर अधिक असते, असे प्रतिपादन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केले.
गोवा विधानसभा संकुलाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित रौप्य महोत्सवी सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विधानसभेचे सभापती गणेश गावकर, विधिमंडळ कामकाज मंत्री माॅविन गुदिन्हो, महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि कर्नाटकचे सभापती जी. एस. पाटील उपस्थित होते. या सोहळ्याला राज्याचे माजी व विद्यमान आमदार, तसेच केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांचेही भाषण झाले. सभापती गणेश गावकर यांनी प्रास्ताविक केले.
मुक्त गोव्यात जन्मलेला मी पहिला मुख्यमंत्री : डॉ. प्रमोद सावंत
गोवा स्वतंत्र राज्य बनले म्हणूनच मी मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकलो. देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले, त्यानंतर १४ वर्षांनी गोवा मुक्त झाला. गोव्याला पहिल्या आणि दुसऱ्या वित्त आयोगाचा लाभ मिळाला नाही, त्यामुळे राज्य काहीसे मागे राहिले. गोव्याच्या मुक्तीसाठी योगदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे मी आज स्मरण करतो. गोव्याच्या मुक्तीनंतर जन्म झालेला मी राज्याचा पहिला मुख्यमंत्री आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले.
टपाल तिकीट, कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन
गोवा विधानसभा संकुलाच्या २५ वर्षांच्या प्रवासानिमित्त एका विशेष टपाल तिकिटाचे आणि विधानसभेच्या इतिहासावर आधारित ‘कॉफी टेबल बूक’चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री, माजी सभापती, उपसभापती आणि माजी राज्यसभा खासदारांचा विशेष बहुमान करण्यात आला. कार्यक्रमाला अॅड. रमाकांत खलप, एदुआर्द फालेरो, चर्चिल आलेमाव, लुईझिन फालेरो, फिलिप नेरी रॉड्रिग्ज, चंद्रकांत कवळेकर, मनोहर आजगावकर, निर्मला सावंत, डॉम्निक फर्नांडिस, सदानंद मळीक यांच्यासह अनेक माजी मंत्री आणि माजी आमदार उपस्थित होते.


