काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना ताब्यात घेताना पोलीस.
गोवन वार्ता न्यूज डेस्क
दिल्ली : देशाच्या राजधानीत मंगळवारी राजकीय वातावरण चांगलेच तापले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी पुकारलेल्या आंदोलनाला मंगळवारी दुपारी हिंसक वळण लागले. संसद भवनापासून सुरू झालेल्या या निषेध मोर्चादरम्यान दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक विरोधी खासदारांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या सुमारे २५० जणांना किंग्सवे कॅम्प पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मंगळवारी सकाळी विरोधी खासदारांनी संसदेतून मोर्चा काढला. दुपारी १२.१५ च्या सुमारास हा मोर्चा आकाशवाणी भवनाजवळ पोहोचला आणि त्याचे रूपांतर थेट धरणे आंदोलनात झाले. पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता राहुल गांधी आणि प्रियांका गांधी आकाशवाणी भवन परिसरात दाखल झाले व त्यांनी मध्यवर्ती भागातच ठिय्या आंदोलन सुरू केले. एसआयआरच्या विरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दोघेही आठ तासांहून अधिक काळ आकाशवाणी भवन परिसरात धरणे आंदोलनाला बसले होते.
या दरम्यान पोलिसांनी आकाशवाणी भवनाबाहेर गोंधळ घालणाऱ्या बहुतांश विरोधी खासदारांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली, ज्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. राहुल गांधी यांच्या दाव्यानुसार, २० विरोधी पक्षांचे ३००हून अधिक खासदार या आंदोलनात सहभागी झाले होते. यामध्ये अखिलेश यादव, मल्लिकार्जुन खरगे आणि अभिषेक बॅनर्जी यांचा समावेश होता.


