म्हापसा : शहरात एका चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत असून म्हापसा शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेससह विविध सामाजिक संस्थांनी पोलिसांवर दबाव वाढवत संशयिताला ४८ तासांत अटक करण्याचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयित फेरीवाल्याची ओळख पटवली असून त्याच्या शोधासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी काँग्रेस पक्षाने आणि काही सामाजिक संस्थांनी राजकीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली म्हापसा पोलीस स्थानकावर धडक दिली. त्यांनी संशयिताला तातडीने अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर ‘टुगेदर फॉर म्हापसा’ या संघटनेने पालिकेकडे शहर सुरक्षा योजना जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच ‘एक म्हापसा, एक आवाज, न्यायासाठी एक लढा’ या मोहिमेअंतर्गत रहिवाशांनी एकत्र येत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
पोलिसांनी पीडितेचे वडील आणि इतर फेरीवाल्यांच्या जबाबानंतर संशयिताची ओळख पटवली आहे. हा संशयित देखील एक फेरीवालाच असून तो बाजारपेठेत साहित्य विक्रीसाठी आला होता. तो राज्याबाहेर पळून जाऊ नये यासाठी वास्को व मडगाव रेल्वे स्थानक परिसरासह आंतरराज्य मार्गांवरील पोलीस यंत्रणांना सतर्क केले आहे. संशयिताला पकडण्यासाठी विशेष पथकांमार्फत शोधमोहीम सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १३७(२), ६५(२), गोवा बाल हक्क कायदा कलम ८, ८(२) आणि पॉक्सो कायदा कलम ४, ६, ८, १० व १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. वैद्यकीय अहवालात पीडितेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले असून, तिच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) उपचार सुरू आहेत.
पीडित मुलीला तिच्या वडिलांनी घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच म्हणजे शुक्रवारी (दि. ६) म्हापसा बाजारात आणले होते. ते मार्केटमधील पदपथावरच इतरांसोबत रात्री झोपत असत. घटनेच्या संध्याकाळी वडील खूप दारू पिऊन झोपले होते. मुलगी रडत असताना या गटात नव्यानेच सामील झालेल्या आणि तिथेच झोपणाऱ्या संशयित आरोपीने तिचे अपहरण केले. त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप असून, त्यानंतर तो तेथून पसार झाला.


