नवी दिल्ली : राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (एनपीपीए) तब्बल १,३६४ कॅन्सरविरोधी औषधांच्या किमतींत घसघशीत कपात केली आहे. यासोबतच डायबिटीज, हृदयविकार आणि वेदनाशामक (पेनकिलर) औषधांच्या किमतीही नियंत्रित करण्यात आल्या असून नवे दर लागू झाले आहेत.
एनपीपीएने १३७ कॅन्सर औषधांच्या ट्रेड मार्जिनवर ३० टक्के मर्यादा निश्चित केली आहे. यामुळे १,३६४ औषधांच्या सुधारित किरकोळ किमती (एमआरपी) ९ नोव्हेंबर २०२६ पासून लागू झाल्या आहेत. यामुळे किमती ९६ टक्क्यांपर्यंत खाली आल्या असून रुग्णांची वर्षाला ३,५४० कोटींची बचत होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
कॅन्सरच्या औषधांसोबतच एनपीपीएने ३४ आवश्यक औषधांच्या किमती नव्याने निश्चित केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने मधुमेह (डायबिटीज), हृदयविकार (हार्ट) आणि वेदनाशामक (पेनकिलर) औषधांचा समावेश आहे. यामुळे सर्वसामान्य रुग्णांचा उपचारांवरील वाढता खर्च आटोक्यात येणार आहे.
नफेखोरीवर नजर
कंपन्यांना त्यांच्या सुधारित किमती रुग्णालये आणि विक्रेत्यांना कळवणे बंधनकारक केले आहे. जर कोणी एमआरपीपेक्षा जास्त पैसे आकारले, तर ग्राहक ‘फार्मा सही दाम’ अॅप किंवा हेल्पलाईनवर तक्रार नोंदवू शकतात, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

