आजकाल आपण नेहमी चित्रपटांमध्ये पाहतो की मोठ्या मोठ्या राजकीय पुढाऱ्यांवर किंवा उद्योगपतींवर सीबीआयची धाड पडते. मनोरंजन म्हणून बघायला मजा येते; परंतु कधी बघताना हा प्रश्न मनात येतो का की 'अरे, मी असा सीबीआय अधिकारी बनू शकतो का?' या व्यक्तीने सीबीआय अधिकारी बनण्यासाठी काय काय प्रयत्न केले असतील? कोणता अभ्यासक्रम यासाठी अभ्यासावा लागतो? कधीपासून या परीक्षेची तयारी करावी लागते? थोडक्यात, १०० पैकी ९९ विद्यार्थी याचा विचारच करत नाहीत व भारतातील सर्वाधिक मानाचे करिअर करण्याची संधी हुकते.
सीबीआयमधील करिअरबद्दल अधिक विस्ताराने माहिती घेऊ.
सीबीआयचे मुख्य कार्यालय नवी दिल्ली येथे आहे. सीबीआय हे एक तपास यंत्रणात्मक आस्थापन आहे. 'Non uniform job of investigation of crime' या सदरामध्ये सीबीआय कार्यालय मोडते. संपूर्ण भारतात कोणत्याही राजकीय दडपणाविना काम करणे, निष्पक्षपाती तपास करणे व आरोपीस कोर्टात उभे करून शासन करणे हे यांचे मुख्य काम असते. कोणताही पदवीधर तरुण/तरुणी सीबीआय अधिकारी होऊ शकतो.
सीबीआयमध्ये मुख्यतः ३ प्रकारचे अधिकारी असतात:
१) Police Sub Inspector (CBI)
२) Asst. Public Prosecutor (CBI - Lawyer)
३) Sr. Public Prosecutor (CBI - Sr. Lawyer)
म्हणजेच सीबीआयमध्ये Police Inspectors तसेच वकील काम करतात. राज्य अथवा केंद्रीय पोलीस दलापेक्षाही अधिक अधिकार सीबीआयला कायद्याने दिलेले आहेत. सीबीआय, रॉ (RAW) इ. संस्था या महत्त्वाच्या तपास संस्था असून त्यांच्या कार्यपद्धतीवर कायदेशीर चौकट असते. पंतप्रधानांचे कार्यालयसुद्धा सीबीआयच्या रडारवर येऊ शकते. थोडक्यात, अतिरिक्त अधिकार यांना दिलेले आहेत. एखाद्या विद्यार्थ्याने १० वीपासूनच जर सीबीआयमध्ये Police Inspector व्हायचे असे ठरवले, तर पदवी पूर्ण होईपर्यंत विद्यार्थी सीबीआयच्या परीक्षेची व अभ्यासाची तयारी करू शकतो.
Staff Selection Commission (SSC Board) ही संस्था सीबीआयच्या भरतीसाठी परीक्षा घेते. Combined Graduate Level Exam (CGLE) (लेखामध्ये CGPE / Combined Graduate Prelim Exam असे नमूद केले आहे) असे परीक्षेचे नाव आहे. कोणताही पदवीधर मुलगा/मुलगी या परीक्षेला बसू शकतात. सीबीआयमध्ये वकील म्हणून रुजू व्हायचे असेल, तर त्याची ५ वर्षांची किमान वकिलीची प्रॅक्टिस असणे गरजेचे आहे. त्यांतही Criminology हा विषय महत्त्वाचा असतो. उंची किमान १६५ सेमी ही मुलांसाठी तर १५० सेमी ही मुलींसाठी अनिवार्य असते.
ही परीक्षा वेगवेगळ्या टप्प्यांत होते. General Intelligence, Reasoning, Quantitative Aptitude, English या विषयांवर MCQ पद्धतीने परीक्षा असते. मुलाखत व व्यक्तिमत्त्व चाचणीचा टप्पाही असतो. या परीक्षांच्या काही टप्प्यांना निगेटिव्ह मार्किंग असते. एकदा या सर्व परीक्षा उत्तीर्ण झाला की उमेदवार CBI Academy, गाझियाबाद येथे पुढील प्रशिक्षण घ्यायला जातो. त्यानंतर तो देशातल्या कोणत्याही शाखेत रुजू होऊन काम सुरू करू शकतो. विद्यार्थ्यांनी १० वीपासूनच General Knowledge, Aptitude, English Comprehension, Numerical Ability, Current Affairs इत्यादी विषयांचा सातत्याने व चिकाटीने अभ्यास केल्यास सीबीआय इन्स्पेक्टर होण्यापासून त्यांना कोणीही रोखू शकणार नाही.

अॅड. शैलेश कुलकर्णी, कुर्टी - फोंडा, (लेखक नामांकित वकील आणि करिअर समुपदेशक आहेत.)


