गोव्यात प्राणघातक आणि गंभीर रस्ते अपघातांचे सत्र सुरूच आहे. राज्यात या वर्षी २६ नोव्हेंबरपर्यंतची आकडेवारी पाहिली असता, एकूण २,४४५ रस्ते अपघातांची नोंद झाली आहे. त्यात २५१ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. तर गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा एकूण अपघातांमध्ये १७.३७ टक्क्यांची (३६२ अपघात), तर अपघाती मृत्यूंच्या संख्येत ८.१८ टक्क्यांची (१९ मृत्यू) मोठी वाढ झाली आहे. याशिवाय राज्यात दररोज सरासरी ७ अपघात घडत असून, दर ३१ तासांनी एका व्यक्तीचा अपघातात मृत्यू होत असल्याचे भयानक चित्र समोर आले आहे.
याशिवाय हल्लीच उदळशे-साकोर्डा येथे घडलेल्या एका दुचाकी अपघातात नववीत शिकणाऱ्या दोन १४ वर्षीय शालेय विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला. साकोर्डा येथील हिराबाई तळावलीकर हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या या दोन्ही विद्यार्थिनी स्कूटरवरून प्रवास करत असताना हा भीषण अपघात घडला होता. तर सदर दुचाकी १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थी चालवत असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, अल्पवयीन मुलांच्या वाहन चालवण्यावर नियंत्रण आणण्याची तीव्र मागणी होत आहे. कायद्याने बंदी असतानाही पालकांकडून अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी दिल्या जात आहेत. परवाना नसताना आणि वाहतुकीच्या नियमांचे ज्ञान नसताना अल्पवयीन मुले भरधाव वेगाने व 'ट्रिपल सीट' दुचाकी चालवून स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालतात.
वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी ते २६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत गोव्यात एकूण २,०८३ अपघात घडले होते. त्यातील २२४ प्राणघातक अपघातांत २३२ जणांचा मृत्यू झाला होता, तर १९८ गंभीर अपघातांत २४७ जण गंभीर जखमी आणि ३९१ किरकोळ अपघातांत ६७९ जण किरकोळ जखमी झाले होते. याउलट, यंदा २०२६ मध्ये याच कालावधीत २,४४५ अपघातांची नोंद झाली आहे. यातील २३९ प्राणघातक अपघातांत २५१ जणांचे बळी गेले आहेत. तसेच २४२ गंभीर अपघातांत ३०२ जणांना गंभीर दुखापत झाली असून, ५५८ किरकोळ अपघातांत ८५८ वाहनस्वार किरकोळ जखमी झाले आहेत. याशिवाय, विनाजखमी १,४०६ अपघात घडले असून, त्यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर गेल्या वर्षी हा आकडा १,२७० होता.
याशिवाय वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनासंदर्भातील सप्टेंबर २०२६ मधील आकडेवारी पाहिली असता, अल्पवयीनांकडून वाहन चालविल्यामुळे २८ जणांवर कारवाई करण्यात आली. तर अल्पवयीनांना वाहन चालविण्यासाठी दिल्यामुळे २३२ वाहनमालकांवर किंवा पालकांवर १०.२२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय 'ट्रिपल सीट' दुचाकी चालविल्यामुळे २,०७४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
राज्यात अपघात वाढण्यामागे प्रामुख्याने वाहन निष्काळजीपणाने चालवणे, अतिवेग, हेल्मेटचा वापर न करणे अशा मानवी चुका तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. काही वाहनचालक रस्त्यावर पोलीस असल्याचे समजल्यानंतर हेल्मेट परिधान करताना दिसतात. त्यांनी हेल्मेट हे आपल्या सुरक्षेसाठी आहे, याची जाणीव ठेवून ते परिधान करावे.
पुढील महिन्यात राज्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.
वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आणि या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वाहतूक विभागाला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे. दरम्यान, राज्यातील वाहतूक विभागाकडे ५० टक्क्यांहून जास्त कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने पणजी परिसरातील वाहतूक कोंडी व इतर प्रश्नांवर स्वेच्छा दखल याचिका घेऊन कारवाई करण्यास सांगितले आहे. तसेच पणजी पोलिसांना कारवाईसाठी मनुष्यबळ वाढविण्यास सांगितले आहे. त्यानुसार, पोलीस खात्याने हल्लीच काही प्रमाणात कर्मचाऱ्यांची पणजी वाहतूक विभागात बदली केली आहे. मात्र, बदली झालेले कर्मचारी अजून रुजू झाले नसल्याची माहिती समोर आली आहे.
याशिवाय राज्यात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असताना वाहतूक पोलिसांकडे असलेल्या कर्मचाऱ्यांची कमतरता तातडीने भरून काढण्याची गरज आहे. पुरेसे मनुष्यबळ मिळाल्यास मुख्य रस्त्यांसह अंतर्गत भागांतही गस्त वाढवता येईल आणि नियमभंग करणाऱ्यांवर वचक बसवता येईल. विशेषतः शाळा-महाविद्यालयीन परिसरात विशेष मोहीम राबवून अल्पवयीन वाहनचालकांवर आणि त्यांना वाहने देणाऱ्या पालकांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कठोर गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे. सोबतच रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती केल्यास भविष्यातील असे दुर्दैवी बळी नक्कीच टाळता येऊ शकतील.



