ब्कॅक फ्रायडे सेल! त्यानंतर ‘वीकेंडपर्यंत मुदतवाढ!’ मग ‘सायबर मंडे, खरेदीची शेवटची संधी!’ अशा जाहिरातींचा मारा सुरूच असतो. शुक्रवारची सवलत रविवारीही सुरू असते आणि सोमवारची शेवटची संधी पुन्हा पुढे ढकलली जाते. हे पाहिल्यावर मनात एक प्रश्न येतो, तो म्हणजे ही शेवटची संधी नेमकी कधी संपणार? खरे तर अशा सवलतींच्या जाहिराती आपल्या मनावर इतक्या प्रभावीपणे काम करतात की, आपण गरजेपेक्षा जास्त खरेदी करतो आणि तरीही आपली बचत झाल्याचा आनंद मानतो.
एक दिवसाची सवलत, आता आठवडाभराचा उत्सव!
पाश्चात्त्य देशांमध्ये थँक्सगिव्हिंग सणानंतरच्या दिवशी ‘ब्लॅक फ्रायडे’ या नावाने मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. सुरुवातीला हा सवलतींचा एक दिवस होता. मात्र, आता भारतातही या सवलतींचे स्वरूप बदलले आहे. एक दिवसाऐवजी संपूर्ण आठवडाभर वेगवेगळ्या नावांनी सवलती दिल्या जातात. असे का घडते? कारण एक दिवसाची सवलत ग्राहकाला लगेच निर्णय घेण्यास भाग पाडते. मात्र, आठवडाभर चालणारी सवलत ग्राहकाचे लक्ष सतत त्या वस्तूकडे वेधून घेते. सुरुवातीला आपण केवळ जाहिरात पाहतो. पुन्हा तीच जाहिरात पाहतो आणि हळूहळू त्या वस्तूची गरज नसतानाही ती खरेदी करण्याचा विचार मनात येऊ लागतो.
किंमत पाहून मनाची होणारी फसगत
एखाद्या शर्टची मूळ किंमत पाच हजार रुपये दाखवली जाते आणि त्यावर दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपये अशी सवलतीची किंमत लिहिली जाते. मूळ किमतीवर काट मारलेला असल्याने आपल्याला ही मोठी बचत वाटते. पण त्या शर्टची खरी किंमत एवढी होती का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारत नाही. मानसशास्त्रात याला ‘अँकरिंग इफेक्ट’ म्हणजेच आधी दाखवलेल्या किमतीचा मनावर होणारा परिणाम असे म्हणतात. एखादी वस्तू किती स्वस्त किंवा महाग आहे, हे ठरवताना आपण पहिल्यांदा पाहिलेल्या किमतीचा आधार घेतो. त्यामुळे मूळ किंमत जास्त दाखवली की सवलतीची किंमत आपल्याला आकर्षक वाटते.
मानसशास्त्रज्ञ डॅनियल काहनेमन आणि अर्थतज्ज्ञ रिचर्ड थेलर यांनी मांडलेल्या संकल्पनाही याच व्यवहाराशी संबंधित आहेत. एखादी वस्तू गमावण्याची भीती आपल्याला ती मिळण्याच्या आनंदापेक्षा अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे ‘फक्त दोनच वस्तू शिल्लक’, ‘मध्यरात्री सवलत संपणार’ अशा जाहिराती आपल्याला घाईघाईने खरेदी करायला लावतात. वस्तू किती उपयोगाची आहे यापेक्षा ती स्वस्त मिळत आहे, याचा आनंद आपल्याला अधिक होतो.
बचतीच्या नादात वाढणारा खर्च
समजा, पाच हजार रुपयांची एखादी वस्तू दोन हजार रुपयांच्या सवलतीत मिळत आहे. पण ती वस्तू खरेदी करण्याचा आपला आधी कोणताही विचार नव्हता. अशा वेळी आपण दोन हजार रुपये वाचवलेले नसतात, तर तीन हजार रुपये खर्च केलेले असतात. खऱ्या अर्थाने बचत तेव्हाच होते, जेव्हा खर्च होणारे पैसे आपल्या खिशात शिल्लक राहतात.
ऑनलाइन खरेदी करतानाही असाच अनुभव येतो. तीन हजार रुपयांचे हेडफोन खरेदी करताना मोफत डिलिव्हरीसाठी आणखी चारशे नव्याण्णव रुपयांची खरेदी करण्यास सांगितले जाते. त्यानंतर अतिरिक्त सवलतीसाठी आणखी एक हजार रुपयांची खरेदी करण्याचा मोह दाखवला जातो. मग आपण गरज नसलेली केबल, मोबाईल कव्हर अशा वस्तूही खरेदी करतो. बिल वाढते, पण मनाला मात्र आपण चांगली बचत केल्याचे समाधान मिळते.
सवलतींच्या मोहावर नियंत्रण कसे ठेवावे?
सततच्या सवलतींमुळे ग्राहकांचाही त्यावरचा विश्वास कमी होऊ लागतो. प्रत्येक वस्तूवर सवलत असेल, तर ती वस्तू प्रत्यक्षात त्या सवलतीच्या किमतीलाच विकली जात असावी, अशी शंका येणे स्वाभाविक आहे. अशा वेळी काही साध्या गोष्टी लक्षात ठेवल्या, तर अनावश्यक खर्च टाळता येऊ शकतो. सर्वप्रथम खरेदीला जाण्यापूर्वी आपल्याला नेमक्या कोणत्या वस्तूंची गरज आहे, याची यादी तयार करावी. त्या वस्तूंच्या नेहमीच्या किमती तपासाव्यात. केवळ सवलतीचा आकडा मोठा दिसतो म्हणून खरेदी करू नये. आपले मासिक बजेट ठरवून त्यापलीकडे खर्च होणार नाही, याची काळजी घ्यावी. ‘फक्त दोन वस्तू शिल्लक’, ‘आणखी पाच जण ही वस्तू पाहत आहेत’, अशा संदेशांमुळे घाई करू नये. एखादी वस्तू आवडली, तर ती लगेच खरेदी न करता काही वेळासाठी खरेदीच्या यादीत ठेवावी. शक्य असल्यास दुसऱ्या दिवशी पुन्हा तिचा विचार करावा. अनेकदा दुसऱ्या दिवशी त्या वस्तूविषयीचा उत्साह कमी झालेला असतो.
काही वेळा कंटाळा, ताणतणाव किंवा मनावरील दडपण कमी करण्यासाठीही आपण खरेदी करतो. अशा वेळी वस्तूची गरज नसतानाही खरेदी केल्याने काही क्षण आनंद मिळतो; मात्र नंतर वाढलेल्या खर्चाची जाणीव होते. म्हणूनच पुढच्या वेळी ‘शेवटची संधी’ अशी जाहिरात दिसली, तर क्षणभर थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, ‘मला खरोखर या वस्तूची गरज आहे की केवळ सवलत मिळतेय म्हणून मी ती खरेदी करतेय?’
लक्षात ठेवा, सवलत मिळणे म्हणजे बचत होणे नव्हे आणि प्रत्येक स्वस्त वस्तू फायदेशीर असतेच असेही नाही. आपल्या गरजा ओळखून, विचारपूर्वक केलेली खरेदी हीच खरी बचत आहे. त्यामुळे खरेदीचा आनंद जरूर घ्या; पण आपल्या खिशाचा आणि मनाचाही ताळेबंद सांभाळा!

डॉ. उबाल्दीना नोरोन्हा (सहयोगी प्राध्यापक, मानसशास्त्र विभाग, सेंट झेविअर्स कॉलेज, म्हापसा)


