अडवई व खोडये जंगलात खैरीच्या झाडांची झालेली कत्तल.
....
गोवन वार्ता प्रतिनिधी
वाळपई
सत्तरी तालुक्यात खैरीच्या झाडांची बेकायदा कत्तल करून लाकडांची तस्करी करण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. अडवई आणि खोडये परिसरात खैरीच्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करून त्यांची तस्करी करण्याचे प्रकार सुरू आहेत. शनिवारी रात्री पुन्हा अशाच प्रकारची घटना उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
अडवई व खोडये परिसरात रस्त्याच्या बाजूलाच खैरीच्या झाडांची कत्तल करून त्यांचे लाकूड कापण्यात आले होते. मात्र, हे लाकूड घटनास्थळावरून वाहून नेण्याचा संशयितांचा प्रयत्न फसल्यामुळे लाकडाचे तुकडे त्याच ठिकाणी सोडून देण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सकाळी या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर या घटनेची माहिती परिसरात वेगाने पसरली. नागरिकांनी या प्रकाराबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच गोवा वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अधिकारी प्रज्योत नाईक यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी खैरीच्या झाडांची कत्तल करून तयार करण्यात आलेले सुमारे २० लाकडांचे तुकडे ताब्यात घेतले. संबंधित लाकूड वाळपई येथील गोदामात सुरक्षित ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वन विकास महामंडळाचे अधिकारी प्रज्योत नाईक यांनी दिली.
यासंदर्भात सोमवारी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या भागात खैरीच्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल झाल्याचे प्राथमिक पाहणीत आढळून आले आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात येणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.
घनदाट जंगलाचा तस्करांकडून फायदा
सत्तरीत घनदाट जंगल असल्यामुळे वनसंपत्तीची बेकायदा कत्तल आणि लाकूड वाहतूक यावर लक्ष ठेवणे मोठे आव्हान ठरत आहे. शनिवारी अडवई व खोडये परिसरात रस्त्याच्या बाजूलाच झाडांची कत्तल झाल्यामुळे हा प्रकार लक्षात आला. मात्र, जंगलाच्या आतील भागात वृक्षतोड होत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वन विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी
खैरीच्या झाडांची कत्तल आणि लाकूड तस्करीचे प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहेत. एखादी घटना उघडकीस आल्यानंतर कारवाई करण्याऐवजी अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी नियमित गस्त, संशयास्पद वाहनांची तपासणी आणि जंगल परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवणे अशा कायमस्वरूपी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.


