मांडवीतील नव्या कॅसिनो जहाजा विरोधात स्थानिकांचे पणजी महापालिकेत ठिय्या आंदोलन

ठरावासाठी बैठक झालीच नाही; पोलिसांनी वाल्मिकी व अन्य आंदोलनकर्त्यांना उचलले :पद्मश्री लिबिया लोबो सरदेसाई सहभागी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
12th February, 04:02 pm
मांडवीतील नव्या कॅसिनो जहाजा विरोधात स्थानिकांचे पणजी महापालिकेत ठिय्या आंदोलन

पणजी: मांडवी नदीतील (Mandovi River) नव्या कॅसिनो जहाजा (Casino Ship) विरोधात ठराव घेण्यासाठी आज होणारी पणजी महापालिकेची (Panjim Muncipal Corporation) बैठक झालीच नाही. यामुळे स्थानिकांनी महापालिकेच्या सभागृहात ठिय्या आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी वाल्मिकी नाईक यांच्यासह अन्य काही आंदोलनकर्त्यांना उचलून सभागृहाच्या बाहेर नेले. सुमारे दोन तासांनंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. यावेळी पद्मश्री लिबिया लोबो सरदेसाई, सबिना मार्टिन यांच्यासह पणजीतील अन्य नागरिक उपस्थित होते. 

याबाबत वाल्मिकी नाईक यांनी सांगितले की, याआधी महापौर रोहित मोन्सेरात यांनी कॅसिनो विषयाबाबत १२ फेब्रुवारी रोजी बैठक घेणार असल्याचे सांगितले होते. यामुळे आम्ही सकाळी ११ वाजता येथे आलो होतो.  मात्र; आम्ही येथे आल्यावर अशी बैठक नसल्याचे समजले. आम्ही येथेच बसण्याचा निर्णय घेतल्यावर पोलीस बळाचा वापर करून काही जणांना बाहेर काढण्यात आले. बैठक होणारच नव्हती तर महापौरांनी आम्हाला खोटे आश्वासन का दिले, त्यांच्यावर, पोलीसांवर कुणाचा दबाव आहे का याची उत्तरे आम्हाला मिळाली पाहिजेत. 

ते म्हणाले, सरकार मांडवीतील जुने जहाज जाऊन तिथे नवीन जहाज येणार असल्याचे सांगते. मात्र; नवीन जहाज ११२ मीटर लांब आणि २७ मीटर उंच आहे. हे जहाज जवळपास ९ मजली इमारती एवढे उंच आहे. जहाजाची क्षमता देखील पाच पटीने वाढली आहे. या जहाजाला मार्ग करून देण्यासाठी दोन कॅसिनोंना हलवावे लागले. मोठ्या कॅसिनोमुळे पणजीतील समस्या देखील वाढणार आहेत. पणजीकरांसाठी हा खूप मोठा विषय आहे. यावर नगरसेवकांनी चर्चा करणे आवश्यक आहे. आज झालेल्या प्रकाराबद्दल महापौरांना पत्र लिहिले असून; आम्ही याचा पाठपुरावा करणार आहोत. 

कॅसिनोंची घाण खायची नाही : लिबिया लोबो 

लिबिया लोबो सरदेसाई म्हणाल्या की, मांडवीतील कॅसिनोला आमचा विरोध आहे. आम्हाला कॅसिनोंची घाण खायची नसून चांगले मासे खायचे आहेत. मांडवीत कॅसिनो येऊ नये यासाठी आमचा लढा सुरूच राहणार आहे.

हेही वाचा