
या आठवड्यात ओटीटीवर प्रेक्षकांसाठी विविध जॉनरचे रोमांचक कंटेंट उपलब्ध होणार आहे. अॅक्शन, थ्रिलर, ड्रामा, रोमान्स अशा अनेक धाटणीच्या कलाकृती ओटीटीवर येत आहेत. मनोज बाजपेयीच्या लोकप्रिय ‘द फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या भागापासून ते ‘द बंगाल फाइल्स’ व ‘होमबाउंड’सारख्या चित्रपटांमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. 
द फॅमिली मॅन ३ । अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ
मनोज बाजपेयीच्या उत्कृष्ट अभिनयामुळे प्रसिद्ध झालेली ‘द फॅमिली मॅन’ सीरिज आता तिसऱ्या सीझनसह परतत आहे. या वेळी कथा अधिक रोमहर्षक असून श्रीकांत तिवारी कोणत्या नव्या संकटांना सामोरे जाणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
द बंगाल फाइल्स । झी५
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित आणि पल्लवी जोशी निर्मित ‘द बंगाल फाइल्स’ थिएटरमध्ये फारशी यशस्वी ठरली नसली तरी ओटीटीवर ती पाहण्याची संधी आता उपलब्ध झाली आहे. मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा २१ नोव्हेंबरपासून झी ५ वर प्रेक्षकांना पाहता येईल.
होमबाऊंड । नेटफ्लिक्स
इशान खट्टर व जान्हवी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘होमबाऊंड’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्येही या चित्रपटाचे कौतुक झाले. आता हा चित्रपट २१ नोव्हेंबरपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे.
जिद्दी इश्क । जीओ हॉटस्टार
अदिती पोहनकर आणि परमब्रीत चट्टोपाध्याय यांच्या भूमिका असलेली ही रोमँटिक-थ्रिलर वेबसीरिजही या आठवड्यात प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहे. रोमान्स आणि सस्पेन्सची सांगड घालणारी ही सीरिज २१ नोव्हेंबरपासून हॉटस्टारवर पाहू शकता.
डाइनिंग विथ द कपूर्स । नेटफ्लिक्स
कपूर कुटुंबाचा ग्लॅमरस आणि मजेशीर ‘डाइनिंग विथ द कपूर्स’ हा शोही याच आठवड्यात प्रदर्शित होतो आहे. रणबीर कपूर, करिश्मा कपूर, करीना कपूर आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह हा शो प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देणार आहे.
द डेथ ऑफ बनी मुनरो । जीओ हॉटस्टार
निक केव्ह यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित ही ब्लॅक कॉमेडी मालिका प्रेक्षकांसाठी एक वेगळाच अनुभव ठरेल. मॅट स्मिथ आणि राफेल मॅथे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेत स्वतःच्या व्यसनांमध्ये अडकलेल्या एका सेल्समनची कथा सांगितली आहे. त्याच्या पत्नीच्या अकाली मृत्यूनंतर, तो आपल्या नऊ वर्षांच्या मुलासह दक्षिण इंग्लंडमध्ये रोड ट्रिपला निघतो आणि याच प्रवासात त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या विचित्र, विनोदी आणि कधी कधी भावनिक घटनांची मांडणी या मालिकेत पाहायला मिळते.
वन शॉट विथ एड शीरन । नेटफ्लिक्स
फिलिप बारांटिनी दिग्दर्शित हा एक तासाचा विशेष संगीतमय कार्यक्रम एड शीरनच्या चाहत्यांसाठी मेजवानी ठरणार आहे. या शोमध्ये एड शीरन न्यू यॉर्कच्या रस्त्यांवर त्याची काही सर्वाधिक लोकप्रिय गाणी थेट सादर करताना दिसतो. लाइव्ह म्युझिक, ऊर्जा आणि शहराचा धडधडणारा माहोल यामुळे हा शो पाहण्यासारखा आहे.
ट्रेन ड्रीम्स । नेटफ्लिक्स
डेनिस जॉन्सन यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित या ऐतिहासिक मालिकेत जोएल एडगर्टन आणि फेलिसिटी जोन्स यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २०व्या शतकाच्या मध्यात घडणाऱ्या या कथेत रेल्वे कामगार रॉबर्ट ग्रेनियरच्या जीवनाचा प्रवास दाखवण्यात आला आहे. कष्ट, संघर्ष, मानवी नातेसंबंध आणि आयुष्याच्या अनपेक्षित सौंदर्याची खोली उलगडणारी ही एक भावनिक कथा आहे.