
पणजी : गोव्यात (Goa) सध्या एक नवा फसवणुकीचा प्रकार पुढे आला आहे. व्हॉट्सअॅपवर बनावट वाहतूक चलन (Fake challan alert) पाठवण्यात येत असून, या चलन फसवणुकीपासून सावधान राहण्याचा इशारा गोवा पोलिसांनी (Goa Police) दिला आहे.
व्हाट्सअॅपवर कथित फसवणुकीचे प्रकार वाढल्याचे दिसून येताच पोलिसांनी खबरदारी म्हणून वरील इशारा दिला आहे. पोलिसांचे लोगो (Police logo) व छायाचित्रे वापरून व्हाट्सअॅपवर बनावट वाहतूक चलन पाठवण्यात येत आहेत. वाहतूक पोलिसांनी अशा संदेशांमधील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका किंवा अटॅचमेंट डाउनलोड करू नका अशी सूचना केली आहे. यासंदर्भात पोलीस विभागाने ट्वीटरवर पोस्ट करून माहिती दिली आहे. ‘फेक चलन अलर्ट’! फसवणूक करणारे पोलिसांचा लोगो, फोटो वापरून व्हाट्सअॅपवर बनावट वाहतूक चलन पाठवत आहेत. कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका किंवा तपशील शेअर करू नका किंवा कोणतीही फाइल डाउनलोड करू नका. असे काही आढळल्या पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गोवा, महाराष्ट्र पोलिसांना टॅग
गोवा पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांना टॅग करून केलेल्या एका सोशल मीडिया वापरकर्त्याच्या तक्रारीनंतर वरील इशारा दिला आहे. त्यांना दहा दिवसांत वेगवेगळ्या नंबरवरून दोन बनावट चलन सूचना मिळाल्या. वापरकर्त्याने सांगितले की, एका बनावट प्रोफाइलमध्ये महाराष्ट्र पोलिसांचा फोटो वापरला आहे, तर दुसऱ्याने वैयक्तिक प्रतिमा वापरली आहे. वाहतूक पोलिसांनी लोकांना सतर्क राहण्याचे व सर्व चलनांची पडताळणी केवळ अधिकृत सरकारी पोर्टलद्वारे करण्याचे आवाहन केले आहे.