चोडणकर गटातील दोघांचा विजय : ‘सहकार नवजीवन पॅनल’चे १२ उमेदवार विजयी

‘बार्देश बाजार’च्या निवडणुकीत विजयी झालेल्या सहकार नवजीवन पॅनलसोबत प्रवर्तक अॅड. रमाकांत खलप.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : बार्देश बाजार ग्राहक सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत अॅड. रमाकांत खलप यांच्या समर्थक गटाची सरशी झाली. महादेव नाटेकर यांच्या नेतृत्वाखालील सहकार नवजीवन पॅनलने धर्मा चोडणकर यांच्या बार्देश बाजार पॅनलचा पराभव केला. नवजीवन पॅनेलमधील सर्व १२ उमेदवार विजयी झाले. त्यामध्ये खलप कुटुंबातील तीन सदस्य आहेत. चोडणकर पॅनलला दोन जागांवर समाधान मानावे लागले.
रविवारी म्हापसा उपनिबंधक कार्यालयातील केंद्रावर २,५५६ पैकी ५३७ सभासदांनी मतदान केले होते. सोमवारी सकाळी १० वा. मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी १ च्या दरम्यान मतमोजणी पूर्ण झाली. अपेक्षितपणे ‘सहकार नवजीवन पॅनेल’चे बाराही उमेदवार बहुमताने निवडून आले. धर्मा चोडणकर यांच्या पॅनेलमधील स्वतः धर्मा चोडणकर व शशिकांत कांदोळकर हे दोनच उमेदवार जिंकले. निर्वाचन अधिकारी रामेश्वर दाभोळकर व सहाय्यक निर्वाचन अधिकारी गोविंद ठाकूर यांनी विजयी उमेदवारांची नावे घोषित केली.
१९८९ मध्ये स्थापन झालेल्या बार्देश बाजारच्या इतिहासात प्रथम निवडणूक घेण्यात आली. आतापर्यंत संचालक मंडळ बिनविरोध निवडून येत होते. संचालक मंडळाच्या १५ पैकी १४ पदांसाठी निवडणूक झाली. सर्वसाधारण गटात १२ पदांसाठी १९ उमेदवार, तर दोन महिला राखीव पदांसाठी ४ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत सहकार नवजीवन पॅनलने वर्चस्व अबाधित राखले. महादेव नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली उतरलेले हे पॅनल प्रवर्तक अॅड. रमाकांत खलप यांचे होते. निकाल लागताच अॅड. खलप यांनी मतमोजणीस्थळी येऊन विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते
सुधीर कांदोळकर ३८६
रवींद्र फोगेरी ३५०
नारायण राटवड ३३५
एकनाथ नागवेकर ३१५
महादेव नाटेकर ३०७
विजय भिके ३०१
निखिलचंद्र खलप २९४
सखाराम गावकर २७७
प्रमोद कर्पे २५७
नितीन नाईक २५७
धर्मा चोडणकर २२१
शशिकांत कांदोळकर २१४
प्रतीक्षा खलप २९४
निर्मला खलप २५९
अनेक आव्हाने असून सहकार क्षेत्राचे कार्य संघटन करायचे आहे. या विजयात अनेकांचे हातभार लागले, त्यांचे मनापासून आभार. पुढील २५ वर्षांसाठी रोडमॅप तयार करायचा आहे. बार्देश बाजारच्या मॉल संकल्पनेला चालना देऊन सहा महिन्यांत काम सुरू केले जाईल. घरपोच विक्री-सेवेला प्रोत्साहन दिले जाईल.
- अॅड. रमाकांत खलप, प्रवर्तक, बार्देश बाजार
सहकार क्षेत्राच्या उत्कर्षासाठी आम्ही काम करतो. निकाल आम्हाला मान्य आहे. चुकीची गोष्ट घडत असल्यास त्यावर नजर ठेवू. मी आजही भाई खलपांसोबतच आहे. मी कधीच भाई खलपांना विरोध केला नाही.
- धर्मा चोडणकर, माजी चेअरमन