वास्को रेल्वे स्थानकावर सापडली ५.३७ लाखांची चांदीची छत्री

बॅग मालकाचा पोलिसांकडून शोध सुरू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15th April, 11:30 pm
वास्को रेल्वे स्थानकावर सापडली ५.३७ लाखांची चांदीची छत्री

वास्को : येथील रेल्वे स्थानकावर वास्को रेल्वे पोलिसांना ८७.५० टक्के शुद्धता असलेली चांदीची छत्री एका बेवारस बॅगेमध्ये मिळाली. याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला. सदर छत्रीसंबंधी माहिती गोव्यातील सर्व पोलीस स्थानकांना वायरलेसद्वारा पाठविण्यात आली आहे. याप्रकरणी आम्ही तपास करीत असल्याचे पोलीस निरीक्षक अमरनाथ पासी यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, दि. १५ रोजी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान वास्को रेल्वे पोलीस व रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे जवान रेल्वे फलाटावर गस्त घालीत असताना त्यांना एक लाल रंगाची बॅग बेवारस स्थितीत मिळाली. त्यांनी ती ताब्यात घेऊन तपासणी केली असता आतमध्ये चादरीमध्ये गुंडाळलेली पांढऱ्या धातुची एक वस्तू दिसून आली. याप्रकरणी त्यांनी स्थानिक सोनाराला पाचारण करून त्याच्यामार्फत त्या वस्तूची तपासणी केली. पडताळणीअंती ती वस्तू चांदीची छत्री (छत) असल्याचे सिद्ध झाले. तिचे वजन ६.४ किलोग्रॅम व किंमत अंदाजे ५ लाख ३७ हजार ६०० रुपये होते. बॅग मालकाचा शोध घेतला जात आहे. 

हेही वाचा