श्रीधर फडके यांनी या गीताला अप्रतिम संगीताचा नजराणा देत आपल्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात केली. या चित्रपटातील संगीत दिलेली गाणी या गाण्यासहित इतकी गाजली, की संगीतकार श्रीधर फडके यांनी मग कधी मागे वळून पाहिले नाही.
भरून आलेली प्रत्येक गोष्ट ही सुंदर असते असे म्हणतात !... मग ते मन असो किंवा आकाश !... कारण या भरून आलेल्या प्रत्येक गोष्टीत भावंनांचे उमाळे दाटून आलेले असतात... हे भरून आलेले मन किंवा आकाश जेव्हा बरसून मोकळे होते, तेव्हा दाटून आलेले मन किंवा आकाश हे मोकळे होताना चैतन्याचे स्फुलिंग फुलत जाते आणि त्यातील साचलेला अंधार नाहीसा होतो.
हीच नेमकी गोष्ट गीतकार सुधीर मोघे यांनी जाणली आणि त्यांनी या भावनेला,
फिटे अंधाराचे जाळे... झाले मोकळे आकाश !...
दरीखोर्यातून वाहे... एक प्रकाश प्रकाश !...
या आपल्या गीतात चपखलपणे शब्दबद्ध केले. अंधाराला जाळ्याची उपमा देत सुधीर मोघे यांनी अंधार हा जरी गुरफटत नेणारा असला, तरी हे अंधाराचे साम्राज्य संपले की होणारा बदल हा किती सुखकारक असतो, याचे नितांत सुंदर वर्णन या गीतात केलेले जाणवते.
गीतकार सुधीर मोघे यांच्या या गीताला सुरांचा बादशाह ज्यांना म्हणतात, ते बाबूजी म्हणजेच अर्थात सुधीर फडके यांनी मिश्र भैरवी रागात हे गीत गाताना या गाण्यातील शब्दांना आपल्या अलवार रेशमी स्वरांनी साज असा काही चढवला की हे गाणे ऐकताना आपण त्यात अगदी तल्लीन होऊन जातो. कधी कधी असं वाटतं की बाबूजींची गाणी चालूच रहावीत आणि आपण डोळे मिटून त्याचा फक्त आस्वाद घेत राहावा... आणि हा सिलसिला असाच अखंड चालूच राहावा !... कधीच संपूच नये !...
लक्ष्मीची पाऊले या चित्रपटात या गाण्याला स्थान मिळाले आणि मराठी चित्रपटातील चॉकलेट हिरो रवींद्र महाजनी आणि अभिनेत्री रंजना यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले. चित्रपट जरी कृष्णधवल रंगसंगतीत असला, तरी या मधुर गीतांमुळे तो कायम लक्षात राहिला. बाबूजींचे पुत्र विख्यात संगीतकार श्रीधर फडके यांनी या गीताला अप्रतिम संगीताचा नजराणा देत आपल्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात केली. या चित्रपटातील संगीत दिलेली गाणी या गाण्यासहित इतकी गाजली, की संगीतकार श्रीधर फडके यांनी मग कधी मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या यशाचा आलेख मग चढत्या क्रमाने चढतच राहिला.
जेव्हा काळोखाची चादर वातावरणात पसरलेली असताना डोंगरा आडून सूर्याचा उदय होतो, तेव्हा चहूकडे चैतन्य पसरते. सूर्याची आभा वातावरणात फाकली जाते आणि त्यामुळे मरगळलेल्या वातावरणाला उभारी येते. झोपी गेलेला जागा व्हावा, अशा तर्हेने अवघे रान जागे होते. पायवाटेवर माणसांची वर्दळ चालू होते आणि त्यामुळे पायवाटाही जाग्या झाल्या... सूर्याच्या उगवण्यामुळे वातावरणातील प्रतिमांच्या सावल्याही उभ्या राहिल्या... असा सरळसोट अर्थ जरी घेतला, तरी या मागची भावना मात्र उदात्त आहे. निराशेच्या काळोखात मनाची अवस्था असताना जेव्हा सकारात्मक विचार किंवा आशेचा एखादा विचार मनात रुजतो, तेव्हा जीवनात लख्ख प्रकाश पडतो. मनातल्या सकारात्मक विचारांवर जे मळभ चढले होते, ते दूर होते आणि मनात सकारात्मकतेचे पैंजण वाजू लागतात. आशांना, विचारांना उभारी येते आणि त्यातून निर्माण होणारी कृती ही लावण्यमयी होऊन जाते !....
रान जागे झाले पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी संगे जागल्या सावल्या
एक अनोखे लावण्य आले भरास ! ...
या गाण्याच्या ओळी ऐकताना असेच काहीसे गीतकार सुधीर मोघे यांच्या मनात असावे असे क्षणभर वाटून जाते ......
दव पिऊन नवेली झाली गवताची पाती
गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठी
क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास !...
आशेचे किरण घेऊन प्रकाशमान झालेल्या सूर्याच्या किरणांनी सृष्टीत आमूलाग्र बदल झाला आणि एका क्षणात उदासिनतेचे दाटलेले मळभ दूर होऊन वातावरणात चैतन्य निर्माण झाले ... परिस्थिती तीच जुनी परंतु त्यात झालेल्या बदलाने ती झाकोळलेली परिस्थितीही पालटून सुंदर झाली आणि पाखरांची तीच किलबिल. परंतु त्यात ही नवा साज चढला गेला !...
या गाण्याच्या शेवटच्या कडव्यात कवी सुधीर मोघे म्हणतात,
झाला आजचा प्रकाश जुना कालचा काळोख
चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास !...
परिस्थिती जरी तीच असली तरी चैतन्याच्या प्रकाशाने काळोख दूर सारला गेला आणि आशेच्या चांदण्याला सोनसळी अभिषेक होऊन आशा पल्लवित झाल्या. त्यामुळे रोजचीच परिस्थिती असली तरी त्याला परत एकदा नव्याने नवा सुंदर असा अर्थ प्राप्त झाला आहे !..
भरुन आलेले आकाश जेव्हा मोकळे होते, तेव्हा माजलेला काळोख दूर होऊन लख्ख प्रकाश चहूकडे पसरतो. मनाचीही तशीच काहीशी अवस्था असते. काळोख हा दु:ख, काळजी, नैराश्य, चिंता यांचाही असतो. जीवनात प्रत्येकजण कधी ना कधी हताश होतो. या अंधाराच्या जाळ्यात एकदा का गुरफटलो गेलो, तर त्यातून बाहेर येणे मुश्किलच !... आणि त्यात ठेचकाळत मार्ग शोधताना झालेली परवड ही जीवन उद्ध्वस्त करून टाकते. हा अंधार मग कसलाही असू शकतो. अज्ञानाचा असू शकतो किंवा नैराश्याचाही असू शकतो. या अंधाराचे जाळे भेदण्याचे सामर्थ्य एका प्रकाशाच्या किंवा आशेच्या किरणात आहे, हे मात्र नक्की !!...
कविता आमोणकर